
धाडसी पोलिसांनी दोघांना पकडून महिलेला त्यांच्या तावडीतून वाचविले आहे. दोन नराधम प्रभाकर पाटील आणि वैभव तरे यांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
डोंबिवली : खिडकाळेश्वर मंदिरात दर्शन घेऊन परत येत असताना एका महिलेचे रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने अपहरण केले, तिला निर्जनस्थळी नेले. तिला नग्न करुन तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात असताना मानपाडा पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचाऱ्यानी त्या दोन्ही नराधमांवर झडप घातली. या दरम्यान या दोन नराधमांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला देखील केला. मात्र धाडसी पोलिसांनी दोघांना पकडून महिलेला त्यांच्या तावडीतून वाचविले आहे. दोन नराधम प्रभाकर पाटील आणि वैभव तरे यांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या दोन्ही धाडसी पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव सुधीर हसे आणि अतुल भोई आहे. महिलेचा जीव आणि आब्रू वाचवणारे या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.
डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव परिसरात राहणाऱी एक महिला शुक्रवारी संध्याकाळी खिडकाळेश्वर मंदिरात गेली होती. दर्शन घेऊन ती रस्त्यावर आली. रस्त्याच्या बाजूला उभे राहून ती रिक्षाची वाट पाहत होती. समोरुन एक रिक्षा आली. त्यात एक प्रवासी आधीच बसला होता. महिलेने रिक्षा चालकाला कोळेगावत जायचे असे सांगितले. महिला रिक्षात बसली. रिक्षा कोळेगावच्या दिशेने निघाली. थोड्याच अंतरावर रिक्षा चालकाने रिक्षा एका निर्जनस्थळाकडे वळवली. जेव्हा महिलेने त्याला विचारले की कुठे जातो. तेव्हा शेजारी बसलेल्या प्रवासाने तिच्या तोंडावर धारदार शस्त्र लावून दोन्ही हाताने तिचे तोंड दाबून धरले.
रिक्षा चालकाने रिक्षा पुढे नेली. रिक्षा जेव्हा निर्जनस्थळी जात होती. याच दरम्यान मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस बीट मार्शल सुधीर हसे आणि अतुल भोई यांनी पाहिले. तोपर्यंत रिक्षा पुढे निघून गेली होती. मात्र या दोन्ही पोलिसांना रिक्षा निर्जनस्थळी का जात आहे याचा संशय आला. दोघांनी रिक्षा ज्या दिशेने गेली आहे. त्याच दिशेने दुचाकी फिरवली. थोड्याच वेळात हे दोघे पोलीस रिक्षा जवळ पोहचले. मात्र त्यांनी पाहिले की, एक महिला नग्न अवस्थेत उभी आहे. तिच्या सोबत दोन तरुण अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे पाहताच त्या दोन्ही पोलिसांनी त्यांच्या दिशेने झडप घेतली. दोघे नराधम आणि पोलिसांत हाणामारी झाली. दोन्ही नराधमांनी एका पोलिसांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.
या हल्ल्यात पोलीस सुधीर हसे हे गंभीर जखमी झाले. तरी देखील त्यांनी त्या दोन्ही नराधमांना सोडले नाही पकडून ठेवले. पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. लगेचच मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश मदने हे घटनास्थळी दाखल झाले. दोन्हीही नराधमाना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये प्रभाकर पाटील हा नराधम कल्याण ग्रामीणमधील उसरघर परिसरात राहतो. तो रिक्षा चालवितो त्याचा साथीदार वैभव तरे हा देखील रिक्षा चालक आहे. वैभव याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तो दिवा येथील आगासन येथे राहणारा आहे. या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र मानपाडा पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका महिलेची जीव आणि आब्रू वाचली. दोन नराधमांना अटक करण्यात आली आहे. धाडसी कामगिरी करणाऱ्या दोन्ही पोलीस सुधीर हसे आणि अतुल भोई यांच्या मानपाड पोलिसांकडून कौतूक करण्यात आले आहे. त्यांचे कितीही कौतुक करावे तेवढे कमीच आहे.