
कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात यंदाचा साजरा होणारा दहीहंडी उत्सवाला पोलिसांनी शिंदे गटाला परवानगी दिली होती.
कल्याण : आज प्रत्येक गावात, शहरात आणि राज्यांमध्ये सुद्धा दहीहंडीचा सण साजरा केला जाणार आहे. काही ठिकाणी दहीहंडीच्या सणाला सुरुवात सुद्धा झाली आहे. अनेक तरुण १-२ महिन्याआधीच दहीहंडीच्या सणाची तयारी करत असतात. याचप्रमाणे कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागील १५ वर्षांपासून शिवसेनेच्या शहर शाखेकडून दहीहंडीचा सण साजरा केला जातो. शिवसेनेच्या पक्षामध्ये दोन गट झाल्यामुळे या सणाच्या वेळी आता अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे वाद सुरु झाले होते. परंतु कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात यंदाचा साजरा होणारा दहीहंडी उत्सवाला पोलिसांनी शिंदे गटाला परवानगी दिली होती.
पोलिसांनी शिंदे गटाला परवानगी दिल्यामुळे ठाकरे गटाने पोलीस आणि महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आणि याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने सुनावणी करत शिंदे गटाला पोलिसांनी आधीच परवानगी दिली असल्याने आणि आता त्यात बदल करणे कठीण आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला गुरुदेव हॉटेल आणि कुबा रेस्टॉरंट यामधील जागेत दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार आज शिवसेना शिंदे गटाकडून शिवाजी चौक परिसरामध्ये मोठा जल्लोषामध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे शिवाजी चौकाच्या काही अंतरावर गुरुदेव हॉटेल जवळ ठाकरे गटही दहीहंडी उत्सव साजरा करत आहेत. दोन्ही दहीहंडी मध्ये शिंदे व ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन होणार आहे.