कल्याण पत्रिपूल परिसरात रुळाजवळ आढळला अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ

संशय आल्याने त्यांनी झुडपात जाऊन पाहिले असता एक मृतदेह अर्धवट जळालेला अवस्थेत आढळून आला.

    कल्याण : कल्याण पूर्वेकडील पत्री पूल परिसरात रेल्वे रुळालगत अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्यक्तीला जाळून त्याची हत्या करण्यात आल्याच्या संशय व्यक्त करण्यात आला आहे. मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. व्यक्ती कोण आहे ही घटना कशी घडली याचा तपास टिळक नगर पोलीस करीत आहेत.

    कल्याण पूर्वेकडे पत्री पूल परिसरातील अशोक सिंगल उद्यानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅक परिसरात रेल्वे पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना रुळा लगत असलेल्या झुडपात काहीतरी जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी झुडपात जाऊन पाहिले असता एक मृतदेह अर्धवट जळालेला अवस्थेत आढळून आला. याबाबत रेल्वे पोलिसांनी टिळक नगर पोलिसांना माहिती दिली .टिळक नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह ताब्यात घेत मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला आहे.

    ३५ ते ४० वर्षाचा इसमाचा मृतदेह असून मयत इसमाची ओळख पटलेली नाही. या व्यक्तीला जाळून त्याची हत्या करण्यात आल्याच्या संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती आसपासच्या परिसरात राहणारी असून आगरी समाजातील किंवा कोळी समाजातील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.