महिलेवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न, गळयातील मंगळसूत्र हिसकावून नराधम झाला पसार, टिळकनगर पोलिसांकडून तपास सुरु

कल्याणच्या उच्चभ्रू सोसायटीत राहणारी एक महिला कल्याण पूर्वेतील होमबाबा टेकडी येथील दर्ग्याच्या दिशेने चालली हाेती.

    कल्याण : दर्गा दर्शनासाठी जात असताना एका महिलेवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न केला गेला. महिलेने प्रतिकार केल्याने नराधम महिलेचे मंगळसूत्र घेऊन पसार झाला आहे. कल्याण पूर्वेतील होमबाबा परिसरात ही घटना घडली आहे. टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

    कल्याणच्या उच्चभ्रू सोसायटीत राहणारी एक महिला कल्याण पूर्वेतील होमबाबा टेकडी येथील दर्ग्याच्या दिशेने चालली हाेती. दर्ग्याच्या आधी गवत वाढलेले आहे. त्या ठिकाणाहून जात असताना एका तरुणाने त्या महिलेला हटकले. तरुणाने महिलेसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न सुरु केला. महिलेने त्याला जोरदार प्रतिकार केला. महिलेने आरडाओरडा सुरू केला. कशीबशी तिने त्या नराधमाच्या तावडीतून सुटका केली. नराधम महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून गेला. पिडीत महिला रडतच टेकडी खाली आली. त्याठिकाणी काही तरुणांनी तिला रडताना पाहून काय झाले अशी विचारणा केली. तिने घडला प्रकार सांगतातच. त्या तरुणांनी त्या पिडीत महिलेला भाजप कार्यकर्ते संतोष चौधरी यांच्याकडे नेले. त्यानंतर पिडीत महिलेला घेऊन संतोष चौधरी श्रीकृष्ण कर येथील पोलीस चौकीत गेले.

    चौकीतील पोलिसांना पिडीत महिलेसोबत काय प्रकार घडला आहे याची माहिती दिली. चौकीतील पोलिसांनी हा प्रकार टिळकनगर पोलीस ठाण्यास कळविला. महिलेला घेऊन पोलीस घटनास्थळी गेले. आत्ता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.