कल्याण डोंबिवलीतील रस्ते विकास कामांना गती द्यावी, एमएमआरडीए आयुक्तांचे आदेश, मुंबईत पार पडली बैठक

रिंग रोड प्रकल्पाचा टप्पा क्रमांक ३ मोठागाव ते दुर्गाडीचे काम सुरू करावे. रिंग रोड टप्पा २ मोठागाव ते काटईचे काम तात्पुरत्या स्वरूपात कोपरपर्यंत करण्यात यावे.

    कल्याण : कल्याण डोंबिवलीतील रस्ते विकास कामाना गती देण्यात यावी असे आदेश एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी महापालिका प्रशासनास दिले आहेत. या संदर्भात मुंबई एमएमआरडीए कार्यालयात एक बैठक पार पडली.

    बैठकीस कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे हे ऑनलाइन उपस्थित हाेते. शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्यासह आमदार बालाजी किणीकर, शिवसेना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी, निलेश शिंदे, जिल्हाप्रमुख राजेश कदम, प्रमोद पिंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. रस्ते विकास कामाकरीता ३६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

    ही कामे पावसाळ्यापूर्वी सुरु करण्यात आली होती. पावसाळ्यात या कामांना ब्रेक दिला गेला होता. ही कामे पाऊस थांबल्याने पुन्हा यूद्ध पातळीवर सुरु करण्याचे आदेश एमएमआरडीए आयुक्तांनी दिले आहेत. त्याचबरोबर मोठागाव मानकोली उड्डाणपूलाची लँडिंग आणि उर्वरित काम लवकर पूर्ण व्हावे. रिंग रोड प्रकल्पाचा टप्पा क्रमांक ३ मोठागाव ते दुर्गाडीचे काम सुरू करावे. रिंग रोड टप्पा २ मोठागाव ते काटईचे काम तात्पुरत्या स्वरूपात कोपरपर्यंत करण्यात यावे. महापालिका क्षेत्रातील रखडलेल्या प्रकल्पांना ‌एमएमआरडीए मार्फत गती देण्यात यावी. या विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यासंबंधीचे आदेश अधिकारी वर्गास दिले गेले.