बिष्णोई गँगने डोंबिवलीच्या नामचीन बिल्डरला दिली पैशांसाठी धमकी

इंद्रजीत यादव याचे पैसे दे नाहीतर तुझा मर्डर करतो असे धमकी दिली. याबाबत प्रशांत जाधव यांनी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

    डोंबिवली : बिष्णोई गँग मधून बोलतोय… इंद्रजीत यादव याचे पैसे दे नाहीतर तुझा मर्डर करतो अशी धमकी डोंबिवलीतील एका प्रसिद्ध बिल्डरला फोन व व्हाट्सअपच्या माध्यमातून एका तरुणाने दिली. विष्णोई गँगचे नाव ऐकून घाबरलेल्या बिल्डरने याबाबत रामनगर पोलिसांना माहिती दिली. रामनगर पोलिसांनी अवघ्या २४ तासात या धमकी देणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकल्यात. आकाश गिरी व इंद्रजीत यादव असे या दोन आरोपींची नावे आहेत. या दोघांचा या गँगशी काही संबंध नाही मात्र इंद्रजीत यादव याचे बिल्डरकडे पैसे बाकी असल्याचे त्याचे म्हणणे आहे ते पैसे काढण्यासाठी दोघांनी बिष्णोई गँगच्या नावाचा वापर करत धमकीचा फोन केल्याचे तपासात उघड झाले.

    डोंबिवलीमध्ये वर्टीकल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचे मालक बांधकाम व्यावसायिक प्रशांत जाधव यांना १३ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास फोन व व्हाट्सअपद्वारे आकाश गिरी या नावाने फोन करून आम्ही बिष्णोई गँग मधून बोलतोय… इंद्रजीत यादव याचे पैसे दे नाहीतर तुझा मर्डर करतो असे धमकी दिली. याबाबत प्रशांत जाधव यांनी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कल्याण डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुऱ्हाडे, रामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी केशव हसगुले आणि विशाल वाघ यांनी या प्रकरणाच्या तपास सुरू केला. पोलिसांनी घटनेचा गांभीर्य ओळखून तात्काळ धमकी देणाऱ्या आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे आकाश गिरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले नंतरची माहिती समोर आली ती धक्कादायक होती. आकाश गिरी हा इंद्रजीत यादव यांच्या मित्र आहे. इंद्रजीतला पैसे मिळवून देण्यासाठी दोघांनी मिळून हा धमकीच्या कट रचला होता. पोलिसांनी आकाश गिरी आणि इंद्रजीत यादव या दोन्ही आरोपींना डोंबिवली परिसरातून अटक करण्यात आली.