खड्डे बुजविण्यावरुन भाजप -शिवसेना आक्रमक, खड्डे बुजवले नाही तर शिवसेना अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकणार

शहरातील रस्त्यावर पावसामुळे ख्ड्डे पडले आहेत. खड्ड्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्याचा त्रास वाहन चालकांसह नागरीकांना सहन करावा लागत आहे.

    कल्याण : केडीएमसी हद्दीतील खड्ड्याबाबत भाजप आणि शिवसेना शिंदे गट आक्रमक होताना दिसत आहे. खड्ड्याबाबत केडीएमसीकडून गणेशोत्सवाआधी खड्डे बुजविण्यात येतील असा दावा करण्यात आला होता. हा दावा आत्ता फेल ठरला आहे. लवकरच आम्ही केडीएमसी अधिकाऱ्यांना भेटून जाब विचारणार असा इशारा भाजपने दिला आहे. तर नवरात्री उत्सवाच्या आधी एक आठवड्यात खड्डे भरले गेले नाही तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकणार असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिला आहे.

    शहरातील रस्त्यावर पावसामुळे ख्ड्डे पडले आहेत. खड्ड्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्याचा त्रास वाहन चालकांसह नागरीकांना सहन करावा लागत आहे. खड्डे बुजविण्याकरीता महापालिकेने १८ कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या होत्या. ही कामे महापालिकेने १० प्रभागात १३ ठेकेदारांना विभागून दिली होती. गणेसोत्सवा आधी खड्डे बुजविले जातील असा दावा महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिला होता. मात्र गणेश विसर्जन झाले तरी खड्डे भरले गेले नाही. महापालिकेच्या या चालढकल कारभाराचा मनसेच्या वतीने आंदोलन करुन निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्या पाठोपाठ आत्ता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने महापालिकेस लक्ष्य केले आहे.

    खड्ड्यांबाबत भाजप आक्रमक
    रविवारी सकाळी कल्याण डोंबिवली ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी कल्याण भाजपाकडून पत्रकार परिषदेचे अजून करण्यात आले होते या पत्रकार परिषदेत कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी भाजप प्रसिद्धी प्रमुख संतोष सोलकर उपस्थित होते. खड्ड्यांविषयी बोलताना जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी सांगितले. केडीएमसी अधिकाऱ्यांकडून गणपती उत्सवाआधी खड्डे बुजविले जातील असे वक्तव्य केले होते. मात्र तशी परिस्थिती नाही. पण महापालिकेस याचा आम्ही जाब विचारु, आत्ता प्रशासकीय राजवट आहे. त्यांच्या काही अडचणी असतील तर आम्ही त्या सोडवू.

    कल्याणमध्ये दुर्गादेवी उत्सव
    शनिवारी संध्याकाळी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी किल्ले दुर्गाडीची पाहणी केली. १५ ते २५ ऑक्टोबर दरम्यान दुर्गा देवी उत्सव साजरा होणार आहे. या वर्षी बुरुजाचे काम सुरु आहे. पहिल्या टप्य्याचे काम झाले आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम मंजूर झाले आहे. निविदा प्रक्रिया तांत्रिक अडचणीमुळे तात्काळ सुरु झालेले नाही. एक महिन्यापूर्वी अधिकाऱ्यांची भेट घेतली. दहा दिवसात उत्सवात १ लाख भक्त येतात. हा धार्मिक उत्सव असतो. या वेळी अनुचित प्रकार घडू नये. बुरुजावर लोड येऊ नये. उत्सव सुरळीत पार पडावा. त्यासाठी पीडब्लू विभागाकडून काम सुरु आहे. उत्सव धुमधडाक्यात साजरा होईल. यावेळी मुख्यमंत्री आणि पालक मंत्री उपस्थित राहणार आहे.

    खड्ड्यांविषयी शिवसेना आक्रमक
    केडीएमसी हद्दीतील खड्डे नवरात्र उत्सवाआधी खड्डे बुजविले जाणार का अशी विचारणा पाटील यांच्याकडे केली असता त्यांनी सांगितले की, जर त्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना करुन त्यांनी खड्डे भरु असे सांगितले आहे. त्यांनी रस्त्यावरील खड्डे भरले नाही तर त्या अधिकाऱ्यालाच खड्ड्यात टाकू असा इशारा प्रशासनाला दिला आहे.