गंभीर गुन्हा करण्यासाठी आलेल्या तरूणाला उल्हासनगरमध्ये अटक

हवासदार कामत यांनी इशारा करताच पोलिसांनी त्या इसमाला घेरून ताब्यात घेतले. त्याने स्वतःचे नाव दुर्गेशकुमार असल्याचे सांगितले.

    डोंबिवली : पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस बाळगून उल्हासनगर येथील शांतीनगर भागातील जगदंबा मंदिर येथे गंभीर गुन्हा करण्यासाठी आलेल्या एका तरूणाला कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी दुपारी सापळा लावून अटक केली. दुर्गेशकुमार कैलास वारे असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव असून तो म्हारळ गावातील रहिवासी आहे. कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना उल्हासनगरमधील शांतीनगर इथे असलेल्या जगदंबा माता मंदिराजवळ एक इसम शस्त्र घेऊन गंभीर गुन्हा करण्यासाठी येणार आहे, अशी गुप्त माहिती मिळाली होती.

    शनिवारी दुपारी वरिष्ठ निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इसम येणाऱ्या ठिकाणी हवालदार प्रशांत वानखेडे, अनुप कामत, विश्वास माने, गोरख शेकडे, बापूराव जाधव, गुरुनाथ जरक यांनी सापळा लावला. ठरल्या वेळेत एक इसम शांतीनगर भागात दुपारच्या वेळेत आला. तो त्या भागात येऊन घुटमळू लागल्याने हवासदार कामत यांनी त्या इसमाला या भागात काय करतो, अशी विचारणा केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेथून तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.

    हवासदार कामत यांनी इशारा करताच पोलिसांनी त्या इसमाला घेरून ताब्यात घेतले. त्याने स्वतःचे नाव दुर्गेशकुमार असल्याचे सांगितले. त्याच्याजवळून ३० हजार रूपये किमतीचे पिस्तूल आणि एक हजार रूपये किमतीची चार जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. पोलिसांच्या मनाईचा आदेश भंग केला. आणि तो या भागात कोणता तरी गंभीर गुन्हा करण्यासाठी आला होता याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याच्यावर उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.