किल्ले दुर्गाडीच्या विकासासाठी २५ कोटींच्या निधीची मागणी, शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांची माहिती

शहर प्रमुख पाटील यांनी सांगितले की, यापूर्वी किल्ले दुर्गाडीच्या विकासाकरीता २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

    कल्याण : ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीच्या विकासाकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणी किल्ले दुर्गाडी नवरात्र उत्सव समितीच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे.

    किल्ले दुर्गाडी येथे दुर्गाडी देवीचे मंदीर आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याठिकाणी नवरात्र उत्सव सुरु केला. गेली ५४ वर्षापासून शिवसेनेच्या वतीने याठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जाताे. येत्या १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे. त्याची माहिती शहर प्रमुख पाटील यांनी आज दिली. या संदर्भात किल्ले दुर्गाडीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर हे देखील उपस्थित होते. नवरात्र उत्सवापूर्वी किल्ले दुर्गाडीची पाहणी शहर प्रमुख पाटील यांनी केली होती.

    शहर प्रमुख पाटील यांनी सांगितले की, यापूर्वी किल्ले दुर्गाडीच्या विकासाकरीता २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर आणखीन पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर निधीतून काही विकास कामे प्रगतीपथावर आहेत. किल्ले दुर्गाडी नवरात्र उत्सवाचे आमंत्रण मुख्यमंत्री शिंदे यांना देण्यासाठी समिती गेली होती. त्यावेळी किल्ले दुर्गाडी विकासासाठी आणखीन २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली आहे. या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कार्यवाही सुरु केली आहे. हा निधी लवकर मंजूर होणे अपेक्षित आहे. या नवरात्र उत्सवास स्वत: मुख्यमंत्री येणार आहे. त्याचबराेबर कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते १६ ऑक्टोबर रोजी किल्ले दुर्गाडीवर दुर्गाडी देवीची आरती करण्यात येणार आहे.