
पोलीस गाडीला नागरीकांची गर्दी जमली होती. हा परिसर महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने त्या व्यक्तिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
कल्याण : मुलीला चोरुन नेत असल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीला चोप देत नागरीकांनी पोलिसांच्या ताब्यात देण्याची घटना कल्याणमध्ये घडली होती. मात्र पोलीस चौकशीत असा काही प्रकार त्या व्यक्तीने केला नस्लयाचे समोर आले आहे. गैर समजूतीतून एका व्यक्तीला नाहक मार खावा लागला. या घटनेमुळे एकच गोंधळ निर्माण झाला होता.
कल्याण पश्चिमेतील बैल बाजार येथील जुने आरटीओ कार्यालयाचा परिसर आहे. या परिसरात एका हॉटेलमध्ये एक पाच वर्षाची मुलगी तिच्या वडिलांसोबत आली होती. हॉटेलच्या बाहेर एक व्यक्ती उभा होता. या व्यक्तीने त्या मुलीला काही तरी देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न केला असल्याच्या संशयावरुन त्याठिकाणी जमलेल्या स्थानिक नागरीकांनी या व्यक्तिची विचारपूस केली. त्याला मराठी हिंदी येत नसल्याने त्याने दाक्षिणात्य भाषेत बोलत होता. नागरीकांना संशय आला त्याला नागरीकांनी चोप दिला. या दरम्यान बाजारपेठ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. बाजारपेठ पोलीस आणि ठाण्याचे पोलीस अधिकारी किरण वाघ त्याठिकाणी पोहचले.
त्या व्यक्तिला पोलिसांनी गाडीमध्ये टाकले. पोलीस गाडीला नागरीकांची गर्दी जमली होती. हा परिसर महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने त्या व्यक्तिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या बाबत वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने यांनी सांगितले की, लक्ष्मण नायक असे त्या व्यक्तिचे नाव आहे. तो टिटवाळ्याला त्याच्या कुटुंबासोबत राहतो, तो दारुड्या आहे. रात्री तो हॉटेल बाहेर बराच वेळ थांबला होता. हॉटेलच्या एका कामगाराने गैरसमजूतीतून काही लोकांना त्याच्या बद्दल माहिती दिली.
मात्र आम्ही मुलगी आणि तिच्या वडिलांची विचारपूस केली असता लक्ष्मण नायक यांनी त्या मुलीला पळवून नेण्याच्या इराद्याने काही केले असावे असे काही आढळून आले नाही. तरी देखील आमची चौकशी सुरु आहे. या घटनेमुळे एक बाब लक्षात येते की, गैरसमजूतीतून एका व्यक्तिला मारहाण झाली. काही अनूचित प्रकार त्याच्यासोबत घडला असता. नागरीकांनी काही तर्क लावण्यापेक्षा पोलिसांना पाचारण केले पाहिजे.