
शिवसेना मनसे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसले. मनसेकडून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. ज्यामध्ये अप्रत्यक्ष रित्या शिवसेनेला आणि खासदारांना निशाणा करण्यात आले.
कल्याण : शिवसेना मनसे वाद कल्याण लोकसभेत विकोपाला गेला आहे. नेत्या पाठेापाठ सोशल मिडियावर देखील शीत युद्ध सुरु झाले आहे. ट्वीटच्या माध्यमातून नेते एकमेकांवर टिका करीत आहेत. तर व्हिडिओ फोटो टाकून कार्यकर्ते राग काढत आहेत. मनसेकडून आपका क्या होंगा माजदार असा व्हिडिओ तयार करुन व्हायरल केला गेला त्यानंतर राजू पाटील यांचा एक आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्यात आला आहे. या प्रकरणात मनसे आक्रमक झाली आहे. फोटो व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ठाेस कारवाई केली नाही तर मी याचा जाब विचारणार असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघाची निवडणूक जवळ आली आहे. या साठी महायुतीकडून श्रीकांत शिंदे हे उमेदवार असणार आहे. तर मनसेकडून राजू पाटील यांचे नाव चर्चेत आहे. महाविकास आघाडीकडून अद्याप कोणत्याही नावाची चर्चा नाही. दिव्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसाला भावी खासदार लिहिलेला केक कापला. त्यानंतर एका कार्यक्रमात खासदार शिंदे यांनी मनसे आमदार पाटील यांच्या विरोधात टिका केली. या टिकेनंतर मनसे आमदार पाटील यांनी खासदारांवर टिका केली.
या दरम्यान शिवसेना मनसे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसले. मनसेकडून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. ज्यामध्ये अप्रत्यक्ष रित्या शिवसेनेला आणि खासदारांना निशाणा करण्यात आले. त्यानंतर सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल झाला. ज्यामध्ये राजू पाटील यांच्या फोटोला छेडछाड करीत आक्षेपार्ह फोटो व्हायरल केला गेला. ज्यामध्ये खालच्या पातळीवरील टिका करण्यात आली होती. या प्रकरणानंतर मनसे आक्रमक झाली आहे. बदनामीकारक पोस्ट सोशल मिडियावर पसरविणाऱ्याच्या विराेधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणात मनसेकडून पोलिसांना सांगितले गेले आहे की, कठोर कारवाई करण्यात यावी. ठाेस कारवाई न केल्यास मनसे आपल्या पद्धतीने संबंधित व्यक्तीचा समाचार घेईल असा इशारा देण्यात आला आहे.
या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सर्जेराव पाटील यांनी सांगितले की, आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही.