महाराष्ट्राच्या दोन महान परंपरा म्हणजे तमाशा आणि वारी, बहुजनांच्या अभिव्यक्तीचं माध्यम म्हणजे तमाशा – संदेश भंडारे

संत ज्ञानेश्वरांनी गीता संस्कृतमधून मराठी भाषेत आणली. असे प्रतिपादन पत्रकार, फोटोग्राफर व लेखक संदेश भंडारे यांनी केले.

    कल्याण : महाराष्ट्रातील शेतकरी दोन वेळा हसतो. एक सुगीच्या वेळी व एक तमाशा पाहताना. पंढरपुर व आळंदीच्या वारीमध्ये साधारणपणे ७ ते ८ तमाशाचे फड असतात. त्यातून शेतकरी वारीच्या माध्यमातून तमाशाकडे वळतो. त्यात लोकशाहीर समाज प्रबोधनाचे काम करतात. १८ व्या शतकात मराठी भाषेचा उदय झाला. संत ज्ञानेश्वरांनी गीता संस्कृतमधून मराठी भाषेत आणली. असे प्रतिपादन पत्रकार, फोटोग्राफर व लेखक संदेश भंडारे यांनी केले. शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या सार्वजनिक वाचनालय कल्याण व रोटरी क्लब ऑफ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी आयोजित ‘तमाशा आणि वारी’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

    महाराष्ट्राच्या दोन महान परंपरा म्हणजे तमाशा आणि वारी. संदेश भंडारे यांनी फोटोग्राफीच्या माध्यमातून जतन व संवर्धनाचे त्यांचे ऐतिहासिक कार्य स्लाईड शो च्या माध्यमातून रसिक वाचकांपुढे मांडले. तमाशा आणि वारीचा इतिहास नमूद करीत संत नामदेव व संत तुकाराम यांनी आपआपल्या काळात प्रबोधनाचे कार्य केले. तसेच शाहिर व सोंगाड्या या तमाशातील पात्रांनी सामाजिक सत्यावर भाष्य करित पत्रकाराचे काम त्या त्या काळात केले. बहुजनांच्या अभिव्यक्तीचं माध्यम म्हणजे तमाशा असे मत संदेश भंडारे यांनी मांडले.

    यावेळी वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर, रोटरी क्लब ऑफ कल्याणचे अध्यक्ष राम मराठे, सरचिटणीस अरुण सपकाळे, वाचनालयाच्या ग्रंथसेविका तसेच श्रोतेवृंद व वाचक सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.