
कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त अतुल पाटील यांनी कामात निष्काळजीपणा करणाऱ्या एएसआय कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली.
कल्याण : एकीकडे शहरात स्वच्छता होत नाही, पालिका काय करते असा जाब शिंदे गटाचे पदाधिकारी मोहन उगले यांनी महापालिका अधिकाऱ्यांवर विचारला या दरम्यान अधिकारी आणि उगलेमध्ये बाचाबाची देखील झाली. तर स्वच्छतेच्या कामामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापालिका कारवाई करते. पण या कर्मचाऱ्यांवर कारवाई का केली असा जाब ठाकरे गट आणि मनसेचे युनियन नेते विचारतात. राजकीय पक्षांच्या दबावामुळे अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे उपायुक्त अतुल पाटील यांनी कामात निष्काळजीपणा करणाऱ्या एएसआय कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली. अतुल पाटील यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, चांगले काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. कामचुकार कर्मचारी यांच्या विरोधात कारवाई केली जाते. आपला उद्देश शहरात स्वच्छता ठेवणे हा आहे. सगळ्यांनी मिळून हे काम केले पाहिजे. परंतू या कारवाईनंतर म्यून्सीपल कर्मचारी कामगार सेनेचे पदाधिकारी सुरेश तेलवणे यांनी उपयुक्त अतुल पाटील यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ही कारवाई फक्त कर्मचाऱ्यांवर का? अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही. याआधी युनियनचे नेते बाळ हरदास यांनी देखील उपायुक्त हे जाणीवपूर्व राग काढण्यासाठी एएसआय कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करीत आहे असा आरोप केला आहे. इतकेच नाही तर मनसे नेते उल्हास भोईर यांनी देखील हिटलरशाही चालू देणार नाही असा इशारा उपायुक्तांना दिला होता.
या नंतर शिंदे गटाचे उपशहर प्रमुख माजी नगरसेवक मोहन उगले यांनी उपायुक्त पाटील यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दोघांमध्ये वाद झाले. मोहन उगले यांचे म्हणणे आहे की, नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. महापालिकेचे लोक काम करीत नाही. सगळीकडे अस्वच्छता पसरली आहे. या कडे महापालिकेने लक्ष दिले पाहिजे.