
शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम आणि शहर प्रमुख राजेश माेरे हे रस्त्याच्या पाहणीकरीता ठाकूर्ली परिसरात पोहचले. याठिकाणी केडीएमसी शहर अभियंता अर्जून अहिरे हे देखील उपस्थित होते.
डोंबिवली : रस्त्याच्या पाहणी दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी केडीएमसीच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. ठाकूर्ली परिसरातील रस्त्याच्या पाहणी दरम्यान उपजिल्हा प्रमुख राजेश कदम आणि शहर प्रमुख राजेश मोरे यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला आहे. दोन दिवस रस्त्यावरील खड्डे भरले नाहीत. तर तुमच्या तोंडाला काळे फासणार असा इशारा दिला आहे. मनसेनंतर आत्ता सत्ताधारी शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. या आधी कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी येत्या आठवड्यात खड्डे भरले नाही तर खड्ड्यात टाकू असा दम भरला होता.
रस्त्यावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरले जातील असे आयुक्तांनी म्हटले होते. खड्डे भरण्याची डेडलाईन १३ सप्टेंबर दिली होती. गणेशोत्सापूर्वी खड्डे भरले गेले नाही. खड्डे भरण्यावर १८ कोटी रुपये खड्ड्यात गेल्याचा आरोप शिवसेना माजी नगरसेवक मोहन उगले यांनी केला होता. त्या पश्चात शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी रस्त्यावरील खड्डे भरले गेले नाही तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकू असा दम भरला होता. त्याच बरोबर मनसेच्या वतीने रस्त्यावरील खड्डे भरले नाही तर आंदोलन करुन असा इशारा दिला होता.
मनसेने खड्ड्यात केक कापून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. आज शुक्रवारी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम आणि शहर प्रमुख राजेश माेरे हे रस्त्याच्या पाहणीकरीता ठाकूर्ली परिसरात पोहचले. याठिकाणी केडीएमसी शहर अभियंता अर्जून अहिरे हे देखील उपस्थित होते. रस्त्याबाबत अधिकारी चालढकल करीत आहेत. हे स्पष्ट आहे. त्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना फैलावर घेत चांगलाच दम दिला आहे. दोन दिवसात रस्त्यावरील खड्डे भरणे आणि स्वच्छता केली नाही तर तुमच्या तोंडाला काळे फासू असा इशारा दिला आहे.