रस्त्यांवर खड्डे, मूलभूत सुविधांचा बोजवारा, मात्र केडीएमसी आयुक्तांच्या कार्यालयावर लाखोंची उधळपट्टी… 

महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना ही उधळपट्‌टी कशासाठी हा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात खड्डे भरण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना आजही खड्ड्याचा त्रास सहन करावा लागतोय तर दुसरीकडे मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालाय. निधी अभावी विकास कामे रखडलीत त्यात महापालिका आयुक्त भाऊसाहेब डांगडे यांचे पालिका मुख्यालयातील कार्यालयावर सुशोभीकरणाच्या नावाखाली लाखोंची उधळण केली जातेय. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना ही उधळपट्‌टी कशासाठी हा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
    कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत पालिका प्रशासनाकडून खड्डे भरण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहन चालक व नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागतोय. त्यातच स्वच्छता कचरा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. शहरात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालेला असताना कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयातील आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्या कार्यालयाचे सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आलंय. तब्बल ४२ लाख रुपये या कामात खर्च होणार आहेत. निधी नसल्याचे कारण देत अनेक विकास कामे रखडलेली असताना दालनावर लाखोंची उधळपट्टी का असा सवाल आता नागरिक उपस्थित करतायत.