कल्याणमधील शिवसेना नेते निलेश शिंदे आणि प्रशांत काळे यांची पुणे जिल्ह्यात संपर्क प्रमुख पदी नियुक्ती

संपर्क दौऱ्याचा अहवाल दर महिन्याला संबंधित जिल्ह्याचे लोकसभा प्रमुख आणि बाळासाहेब भवन याठिकाणी देणे अपेक्षित आहे.

    कल्याण : कल्याणमधील दोन शिवसेना नेते प्रशांत काळे आणि निलेश शिंदे यांची पुणे जिल्ह्याच्या शिवसेना संपर्कपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर या दोघांनी अनेक जिल्ह्यात जाऊन पक्ष वाढविण्याचे काम केले आहे. त्यांचा जनसंपर्क पाहता पक्षाने ही जबाबदारी या दोघांना दिली आहे.

    केडीएमसीचे माजी नगरसेवक आणि सध्या शिवसेना कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे आणि शिवसेना पदाधिकारी प्रशांत काळे यांची पुणे जिल्हयासाठी संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केल्याची घोषणा आज मंगळवारी करण्यात आली आहे. प्रशांत काळे यांना पर्वती पुणे छावणी, कसबा पेठ विधान सभा या तीन विधानसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर निलेश शिंदे यांची जिल्हयातील वडगाव शेरी, शिवाजीनगर कोथरुड विधानसभा मतदार संघाकरीता नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघांना प्रत्येक महिन्यात दोन संपर्क दौरे करणे अपेक्षित आहे. संपर्क दौऱ्याचा अहवाल दर महिन्याला संबंधित जिल्ह्याचे लोकसभा प्रमुख आणि बाळासाहेब भवन याठिकाणी देणे अपेक्षित आहे.

    निलेश शिंदे २०१५ साली राष्ट्रवादी नगरसेवक पदाची निवडणूक लढवून नगरसेवक पदी निवडून आले होेते. २०१४ साली विधानसभेची निवडणूक कल्याण पूर्व मतदार संघातून लढविली होती. निलेश शिंदे यांनी खासदार शिंदे यांच्या कामाने प्रभावीत होऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या फूटीनंतर निलेश शिंदे हे शिंदे गटात गेले होते. त्यांच्याकडे कल्याण पूर्व विधान सभा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार शिंदे यांनी त्यांच्यावर काही पक्षीय जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्या चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडल्याने त्यांना पुण्यातील दोन विधानसभा मतदार संघाची जबाबदारी दिली आहे.

    त्याचबरोबर प्रशांत काळे यांची राजकीय सुरुवात राष्ट्रवादीकडून झाली. त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीतून नगरसेविका पदी निवडून आल्या होत्या. काळे आणि त्यांच्या पत्नीने शिवसेनेत प्रवेश केला. काळे यांच्यावर कल्याण पूर्वेची उप विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी दिली गेली. त्यांनीही चांगल्या प्रकारे काम केल्याने त्यांच्याकडेही पुण्यातील दोन मतदार संघाची जबाबदारी दिली गेली आहे.