कल्याणमध्ये घर देतो सांगून फसवणूक करणाऱ्या सुनिल पोटेला साडे चार वर्षाची शिक्षा

गेल्या १९ महिन्यापासून तो न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याने जमीनासाठी सहा वेळा जिल्हा न्यायालय आणि दंडाधिकाऱ्यांकडेही सहा वेळा अर्ज केला होता.

    कल्याण : घर आणि दुकानाचे गाळे देतो असे सांगून नागरीकांची फसवणूक करणाऱ्या सुनिल पोटे याला ठाणे न्यायालयाच्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी चाडे चार वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात फिर्यादीचे वकील महेश शिवदास आणि विक्रम गायकवाड यांनी काम पाहिले.

    सुनिल पोटे यांनी कल्याणमधील रहिवासी पूरण रामकृपाल मौर्या यांना एक घर आणि दुकानाचा गाळा देतो असे सांगितले होते. त्या बदल्यात मौर्या यांनी पोटे याला १५ लाख रुपये दिले होते. त्यांना दुकान आणि घर काही मिळाले नाही. त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेतली. मौर्या यांच्या प्रमाणे पोटे यांनी अन्य सात जणांची अशी फसवणूक करीत त्यांच्याकडून पैसे उकळले होते. या सगळ्यांची जवळपास ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पोटे याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक करण्यात आल्यावर त्याची परवानगी न्यायालयीन काेठडीत करण्यात आली.

    गेल्या १९ महिन्यापासून तो न्यायालयीन कोठडीत असल्याने त्याने जमीनासाठी सहा वेळा जिल्हा न्यायालय आणि दंडाधिकाऱ्यांकडेही सहा वेळा अर्ज केला होता. त्याचा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. त्याने तक्रारदारांचे पैसे देण्याची तयारी दाखविली होती. या आधारे त्याला जामीन मंजूर करण्यात यावा असे न्यायालयास त्याने सांगितले होते. त्याच्या जामीन अर्जास तक्रारदार मौर्या यांचे वकिल महेश शिवदास यांनी हरकत घेतली होती. हे प्रकरण कल्याण न्यायालयातून ठाणे न्यायालयाकडे पाठविले गेले. या प्रकरणी काल ठाणे न्यायालयातील मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी पोटे याला साडे चार वर्षाची शिक्षा आणि १५ लाखाचा दंड ठोठावला आहे. यापूर्वीही पोटे यांच्या विरोधात महात्मा फुले, पनवेल आणि मुंबईत फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याने त्या गुन्ह्यात अनेकांची काेट्यावधी रुपयाची फसवणूक केली आहे. तसेच त्याने अनेकांना दिलेले धनादेश वाटलेले नाहीत. या पूर्वीच्या प्रकरणात तो फरार हाेता. यापूर्वीही त्याला शिक्षा लागलेली आहे.