चक्क कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याची जागा आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्न पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा सांगणाऱ्या शिर्के सातवाहन याने सादर केलेली कागदपत्रे ही साक्षांकित नव्हती.

    कल्याण : किल्ले दुर्गाडीवर दावा करणाऱ्या सुयश शिर्के सातवाहन यांच्या विरोधात कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्के सातवाहन हा माळशेज घाट वनक्षेत्र आणि पर्यटनस्थळ विकास समितीचे अध्यक्ष असल्याचे म्हटले हाेते. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर दुर्गाडी किल्ल्याची जागा आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या विरोधात पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    कल्याणमधील किल्ले दुर्गाडी हा स्थान शिवकालीन आहे. किल्ले दुर्गाडी हा ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत आहे. माळशेज घाट वनक्षेत्र आणि पर्यटन स्थळ विकास समितीचे अध्यक्ष शिर्के सातवाहन याने कल्याण तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. या अर्जानुसार त्याने एका जमीनीच्या उताऱ्यावर ना हरकत दाखल मागितला होता. हा अर्ज जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयाकडे चौकशीकरीता गेला. त्याठिकाणाहून चौकशी होऊन तो कल्याण तहसील कार्यालयास प्राप्त झाला. कल्याण तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रिती गुडे यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे की, ज्या जागेसंदर्भात शिर्के सात वाहन याने अर्ज केला होता. त्याठिकाणी किल्ले दुर्गाडी आहे. किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा सांगणाऱ्या शिर्के सातवाहन याने सादर केलेली कागदपत्रे ही साक्षांकित नव्हती.

    तसेच नोंदणीकृत नसल्याचे दिसून आले. तसेच अधिकची तपासणी आणि छाननी केली असता शिर्केची कागदपत्रे ही संशयास्पद, बनावट आणि बोगस असल्याचे दिसून आले असे मंडळ अधिकारी गुडे यांनी म्हटले आहे. तसा अहवालच गुडे यांनी कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांना सादर केल्यावर देशमुख यांच्या आदेशानुसार गुडे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिर्के यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांचे म्हणणे आहे की, बोगस कागदपत्रचा आधारावर दुर्गाडी किल्ल्याच्या जागेवर नाव लावण्याचा प्रयत्न झाला आहे या प्रकरणाची तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.