मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, आमदार राजू पाटील यांची देखील उपस्थिती

दिवा, पलावा, मानकोली व ठाकुर्ली येथील रखडलेल्या पुलांच्या कामासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली आहे. पलावा चौकातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास होत असलेली दिरंगाईबाबत देखील चर्चा करण्यात आली आहे.

    कल्याण ग्रामीण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे. राज्यातील टोल नाक्यांबाबत आणि दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाईबाबत करण्याबाबत पूर्वनियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार राजू पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील प्रतिनिधीत्व करत असलेल्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातील प्रलंबित विषयांवर चर्चा केली आहे.

    मनसे आमदार राजू पाटील प्रतिनिधित्व करत असलेल्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कल्याण शीळ या रस्त्यावरील वाहतूक कोंडी, नागरिकांना होणारा अपुरा पाणी पुरवठा यांसह अन्य समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे शनिवारी आमदार राजू पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. तसेच एमएमआरडीए कडून कल्याण ग्रामीण भागातील एमएमआर क्षेत्रात येणाऱ्या बाह्य रस्त्यांसाठी ६९.५५ कोटी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. कल्याण डोंबिवली महानगपालिका हद्दीतील महत्त्वाच्या कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास क्षेत्रातील मुंबई नागरिक पायाभूत सुविधा प्रकल्पांअंतर्गत १८ गावांमध्ये अंतर्गत सोयी-सुविधांसाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

    ठाणे-गायमुख कोस्टल रोडच्या सर्व्हेक्षणासोबतच मुंब्रा-दिवा-कोपर-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याचे सर्व्हेक्षण करुन आराखडा तयार करणे, जिल्हा खनिज प्रतिष्ठान ठाणे, खनिज विकास निधी कल्याण ग्रामीण मतदारसंघातील शाळांच्या कामांकरिता ८ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका जि.ठाणे क्षेत्रातील कामांना मुलभूत सोयी-सुविधा योजनेअंतर्गत मंजूरी देऊन निधी उपलब्ध करुन देणेबाबत १० कोटीची मागणी करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील १४ महसुली गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अंतिम अधिसुचना काढून लवकरात लवकर समावेश करणेबाबत देखील चर्चा करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येकरिता उल्हासनदी पात्रातून नवी मुंबई महानगरपालिकेस व्यपगत होणारा १४० द.ल.लि. प्रतिदिन पाणी कोटा कल्याण डोबिवली मनपासाठी वर्ग करुन उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये होणाऱ्या जलसाठ्यावर पाणी आरक्षण मिळण्याकरिता तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे.

    दिवा, पलावा, मानकोली व ठाकुर्ली येथील रखडलेल्या पुलांच्या कामासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली आहे. पलावा चौकातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास होत असलेली दिरंगाईबाबत देखील चर्चा करण्यात आली आहे. २७ गावातील अमृत पाणी पुरवठा योजनेमधील कामे अद्यापही प्रलंबित असल्याने त्यांना गती देण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. कल्याण, डोंबिवली, दिवा, रेल्वेस्टेशन परिसरातील १५० मिटर मधील अनधिकृत फेरीवाले, आगासनमधील (ठाणे महानगरपालिका) खाजगी जमिनींवर टाकलेले आरक्षण, डायघरमधील कचरा प्रकल्पाचे पूर्णपणे काम झाले नसतानाही प्रकल्प सुरु झाल्यामुळे प्रदूषणाचा स्थानिकांना त्रास होत असून त्याला असलेला स्थानिकांचा विरोध, कल्याण शिळफाटा रस्त्यावरील बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासंदर्भात शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी देखील मांडलेल्या वस्तुस्थितीवर मार्ग काढू असे आश्वासन दिल आहे.