उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कल्याण डोंबिवलीतून मुंब्र्यात जाणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना पोलिसांकडून नोटीसा

कल्याण डोंबिवली मधून देखील शेकडो शिवसैनिक मुंब्र्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ दाखल होणार आहेत.

    कल्याण : मुंब्रा येथील शिवसेना शाखा जमीनदोस्त केल्यानंतर शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट दोन्ही आमने सामने उभे ठाकलेत. ठाकरे गटाने शाखेप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज मुंब्र्यात उद्धव ठाकरे येणार असून या शाखेला भेट देणार आहेत .या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसैनिकाकडून मुंब्रा येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

    कल्याण डोंबिवली मधून देखील शेकडो शिवसैनिक मुंब्र्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण आणि डोंबिवली पोलिसांनी ठाकरे गटाच्या कल्याण डोंबिवली मधील शहर प्रमुख उपजिल्हाप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर ,कल्याण पूर्व शहर प्रमुख शरद पाटील, यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आल्यात. या कारवाई विरोधात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारकडून सत्तेचा गैरफायदा घेत कायमच दबावाचे राजकारण केले जाते, पोलिसांकडून दबाव टाकत अन्यायकारक कारवाई सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी नोटीसा बजावल्या तरी आम्ही मुंब्र्याला जाणार अशी ठाम भूमिका ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.