जुन्या पेन्शन योजनेसाठी कल्याण आरटीओ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

आता मिळत असलेली जुनी पेन्शन टिकवायची असेल आणि नवीन पेन्शन रद्द करुन जुनी पेन्शन सर्वांना लागू करुन द्यायची असेल तर त्यासाठी राज्य शासनाच्या प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे.

    कल्याण : जुन्या पेन्शन योजनेसाठी कल्याणमध्ये आरटीओ कर्मचाऱ्यांनी आरटीओ कार्यालयात आंदोलन केले. मोटार वाहन कर्मचारी संघटना कल्याणचे अध्यक्ष सुधाकर कुमावत, सरचिटणीस पावबा कंखर, कार्याध्यक्ष सचिन तायडे, मार्गदर्शक बळीराम कांबळे तसेच शासकीय निमशासकीय, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना कल्याणचे अध्यक्ष नरेंद्र सांगळे आदींसह इतर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.
    आता मिळत असलेली जुनी पेन्शन टिकवायची असेल आणि नवीन पेन्शन रद्द करुन जुनी पेन्शन सर्वांना लागू करुन द्यायची असेल तर त्यासाठी राज्य शासनाच्या प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे, रिक्त पदे भरणे, विना अट अनुकंपा नियुक्ती, कंत्राटीकरण धोरणाचे उच्चाटन करणे, चतुर्थश्रेणी कर्मचारी व वाहनचालक पद भरतीवरील बंदी उठविणे, शिक्षण क्षेत्रातील दत्तक योजना, समुह शाळा योजनांद्वारे शाळांचे होणारे कार्पोरेट धार्जिणे खाजगीकरण रद्द करणे, नविन शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करणे, पाचव्या वेतन आयोगापासूनच्या वेतनत्रुटी दूर करण्यासाठी यंत्रणा स्थापित करणे.
    सेवानिवृत्तीचे वय ६० करा या इतर महत्वाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री पातळीवर ठोस निर्णय व्हावा या रास्त आग्रहासाठी राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी – शिक्षक यांनी १४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला पाठिंबा देत कल्याण आरटीओमधील कर्मचाऱ्यांनी देखील आज आंदोलन केले.