नागरिकांनी घेतला म्हाडा इमारतीचा ताबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष आक्रमक

पोलिसांनी खाजगी विकासाच्या सांगण्यावरून आंदोलनकर्त्यांना बाहेर काढले असून महिलांना मारहाण केल्याचा आरोप गायसमुद्रे यांनी केला आहे.

    कल्याण : शिळफाटा नजीक असलेल्या भंडार्ली येथील रहिवासी निवृत्ती पाटील यांच्या सिटी सर्वे नंबर १३ च्या गायरान जमिनीला महाराष्ट्र शासनाने गावाच्या विकासासाठी आरक्षित केली होती. मात्र म्हाडा या निमसरकारी संस्थेने जागेवर अवैधरित्या कब्जा करत खाजगी विकास कामामार्फत भव्य इमारती उभारल्या. यामुळे भंडार्ली, दहिसर, गोठेघर रजिया मार्केट येथील लाभार्थी नागरिकांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष आक्रमक झाला असून राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग गायसमुद्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी या म्हाडा इमारतींचा ताबा घेतला. ही बाब स्थानिक डायघर पोलिसांना समजताच पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना इमारती बाहेर काढले.

    पोलिसांनी खाजगी विकासाच्या सांगण्यावरून आंदोलनकर्त्यांना बाहेर काढले असून महिलांना मारहाण केल्याचा आरोप गायसमुद्रे यांनी केला आहे. यावेळी पोलिसांच्या विनंतीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. ही जागा ग्रामपंचायत शाळेसाठी राखीव ठेवली होती त्या जागेवर या इमारती उभारल्या असून या इमारती निष्कासित करण्यात याव्यात किंवा या इमारतीत येथील नागरिकांना सदनिका देण्याची मागणी गायसमुद्रे यांनी केली. या आंदोलनात आत्माराम पाटिल, सुंदरा पाटिल, शांताराम भिवसने, यूसुफ शेख, नाना गायसमुन्द्रे, इकबाल खान, आतिख खान, अल्ताफ शेख, द्वारकानाथ पाटिल, सरला गायकर, किशोर सोनवणे, इसरार खान, शंकर सावंत, वैजनाथ कांबळे आदींसह इतर नागरिक मोठ्यासंख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.