कल्याणमध्ये चोरट्या इराणीकडून पुन्हा पोलिसांवर प्राणघातक हल्ला, दहा पोलीस जखमी

रात्री २ वाजताच्या सुमारास पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत असताना इराणी वस्तीतील महिला पुरुष आणि चोरट्यांच्या नातेवाईकांनी दगडफेक सुरु केली.

    कल्याण – अमजद खान : कल्याण जवळ असलेल्या इराणी चोरट्याने पुन्हा एकदा पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रात्री आरोपीला पकडण्यासाठी अंधेरी पोलिसांचे एक पथक खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इराणी वस्तीत दाखल झाले. पोलिसांचे पथक दाखल होताच चाेरट्या इराणी वस्तीतील महिला पुरुषांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात दहा पोलीस जखमी झाले आहेत.

    कल्याण पश्चिमेतील आंबिवली परिसरात इराणी वस्ती आहे. ही वस्ती चोरट्यांची वस्ती म्हणून अशी ओळख आहे. दिवसाढवळया इराणी चोरटे सामान्य नागरीकांना लूटतात. चैन स्नेचिंग, भूलथापा मारुन लाखो नागरीकांना आत्तापर्यंत यांनी लूटले आहे. देशभरात या इराणी चोरट्यांचे जाळे पसरले आहे. यांना सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न पोलिसांकडून केले गेले. परंतू अद्याप काही फरक पडलेला नाही. जेव्हा पोलीस या इराणी चोरट्यांना पकडण्यासाठी जातात. पोलिस पथकावर हल्ले करतात.

    अशीच एक घटना २००८ साली घडली होती. रेल्वे फाटकाजवळ क्राईम ब्रांच पथकावर हल्ला केला गेला होता. त्यावेळी पाेलिसांना गोळीबार केला होता. आत्तापर्यंत ५० वेळा हल्ला करण्यात आला आहे. आत्ता नवी घटना गुरुवारी पहाटे घडली आहे. अंधेरी पोलीस ठाण्याचे काही पोलीस एका आरोपीच्या शोधात आले होते. त्यांच्यासोबत खडकपाडा पोलीस ठाण्याचे काही पोलीस गेले होते.

    रात्री २ वाजताच्या सुमारास पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत असताना इराणी वस्तीतील महिला पुरुष आणि चोरट्यांच्या नातेवाईकांनी दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत १० पोलीस जखमी झाले आहेत. रात्री अंधार असल्याने एकदम गोंधळाची परिस्थिती होती. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीत महिला पुरुषांचा समावेश आहे. एकतर चोरी आणि पुन्हा शीरजोरी अशी स्थिती होती. या इराणी चोरट्यांचे करायचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकीकडे पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दिवसरात्र पोलीस काम करतात. दुसरीकडे पोलिसांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. या इराणी चोरट्यांमधील एक चोरट्याला अटक करण्यात आली आहे तर २ चोरटे फरार झाले आहेत. याकडे सरकार कधी लक्ष देणार या इराणी चोरट्यांच्या विरोधात ठोस कारवाई कधी होणार असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.