कल्याणच्या चिमुकल्यांनी सर केला अतिकठिण श्री मलंगगड

    कल्याण : अतिकठिण मानला जाणारा श्री मलंगड कल्याणच्या ४ वर्षीय श्राव्या भोसले, साक्षी हिप्परकर, ८ वर्षीय सृजन धर्माधिकारी, १० वर्षीय ईशान पासवान, नंदिनी थोपटे या चिमुकल्यांनी महाराष्ट्रात कल्याण शहराचे नाव उंच केलेल्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या तज्ञ गिर्यारोहक संघाच्या मार्फत श्री मलंगगडावर यशस्वी चढाई केली.

    कल्याणचा श्री मलंगगड म्हणजे माथेरान डोंगर रांगेत उभा असलेला सुमारे ३ हजार २०० फूट उंच असलेला टेहळणी कडा. शिलाहार राजाने निर्माण केलेला हा तत्कालीन कालखंडात फक्त आजूबाजूच्या परिसरावर लक्ष देण्यासाठी बनवला गेला होता. कल्याणच्या दक्षिणेपासून अवघ्या सोळा किलोमीटर अंतरावर हा गड आहे. पनवेल-वावंजे गावापासून हा किल्ला दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे. बदलापूरच्या नैऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे. करंजा, उरणच्या नैऋत्येस आणि बोरघाट, भीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा किल्ला होता.

    श्री मलंगड म्हंटल तर माथा गाठण्यासाठी करावी लागते ती अगणिक मेहनती सुमारे दोन तासांची चढाई त्यात गरज लागते ती भयावर मात करण्यासाठी मानसिक तयारी ची कारण गडाचा माथा गाठण्यासाठी हजारो फुटांवर असलेल्या अगदी एकच पायाला जागा ठेवता येइल अश्या पाइप वरून जाण्याची वाट. चुकीला माफी नाही अश्या अर्थानेच श्री मलंगड उभा असावा कारण किंचित ही पाय निसटला तर भीती असते हजारो फूट दरीत कोसळण्याची.

    असा हा कठीण गड या चिमूकल्यांनी सर केला असून सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाच्या वतीने दर्शन देशमुख, रणजित भोसले, पवन घुगे, भूषण पवार, सुनील खणसे, संजय कारे, प्रशिल अंबादे, अभिषेक गोरे आणि सुहास जाधव यांनी तांत्रिक सहकार्य आणि मानसिक सहकार्य करून मोहीम यशस्वी करून दाखवली.