कणकवली तालुक्यात पदवीधर व्यक्तींनी मतदार नोंदणी करावी, कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांचे पदवीधरांना आवाहन

मतदार मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेचा पदवीधर आवश्यक आहे. मतदार नोंदणी करताना नमुना नं.१८ भरणे आवश्यक आहे.

    कणकवली : पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी ०१ नोव्हेंबर २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित जाहीर केला आहे. भारत निवडणूक आयोगाने पदवीधर मतदार संघासाठी मतदार याद्या पुनर्निरीक्षण कार्यक्रम ३० सप्टेंबर पासून घोषित केलेला आहे. सदर कार्यक्रमानुसार नमुना नंबर १८ द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याची अंतिम तारीख ६ नोव्हेंबर २०१३ हा आहे. यासाठी नोव्हेंबर २०२० पूर्वी पदवी शिक्षण पूर्ण झालेले व्यक्ती मतदार म्हणून नाव नोंदणी करु शकता. तरी कणकवली तालुक्यातील अशा व्यक्तींनी मतदार म्हणून नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन तहसिलदार दिक्षांत देशपांडे यांनी केलेले आहे.

    त्यासाठी कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी पात्र पदवीधर मतदाराचे वय १८ पूर्ण असणे आवश्यक आहे. मतदार मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेचा पदवीधर आवश्यक आहे. मतदार नोंदणी करताना नमुना नं.१८ भरणे आवश्यक आहे. त्यासोबत समोरच्या बाजूने पूर्ण चेहरा दिसेल, असे नजीकच्या काळातील पांढऱ्या पार्श्वभूमीवर सही नसलेले पासपोर्ट साईज रंगित छायाचित्र पदवी गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, आधार कार्ड, निवडणुक कार्ड, किंवा लाईट बील, नावात बदल असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा राजपत्र, पॅनकार्ड आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. नमुना १८ सोबत सादर करण्यात येणारे पुराव्याचे कागदपत्र हे पदवीधर मतदार यांनी कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती स्वयंसाक्षांकीत करून अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावेत. यासाठी मतदार नोंदणी अधिकारी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ तथा विभागीय आयुक्त कोकण विभाग निवडणूक नायब तहसिलदार प्रिया हर्णे परब, कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण याची अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

    तरी पदवीधर मतदार निवडणूकीकरीता मतदार नोंदणी करणारे मतदार यांनी निवडणूक नायब तहसिलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती कणकवली यांच्या समक्ष मूळ कागदपत्रे दाखवून त्यांच्या झेरॉक्स प्रती सत्यप्रत करून घेणे आवश्यक आहे. तसेच पात्र मतदार हे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या https://gterollregistration.mahait.org/ या संकेतस्थळावर मतदार नोंदणी करु शकतात. पदवीधर मतदार नोंदणीकरीता आवश्यक नमुना १८ तहसिलदार कार्यालय कणकवली येथील निवडणूक शाखेत विनामूल्य उपलब्ध आहेत, तरी पदवीधर व्यक्तींनी मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.