लाडक्या बाप्पाला निरोप देताना भक्तांचे डोळे पाणावले, गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर…!

सर्वत्र वातावरण गणेशमय झाले आहे. आरत्या, भजनांनी वाड्या-वस्त्या निनादून गेल्या आहेत.

    कणकवली : गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला..असा जयघोष करत गणेशभक्तांनी शनिवारी सायंकाळी गौरी गणपतींचे विसर्जन केले. लाडक्या बाप्पाला निरोप देताना भक्तांचे डोळे पाणावले होते.

    मंगळवारी सर्वत्र गणेशमूर्तीची घरोघरी विधीवत स्थापना करण्यात आली. त्यामुळे सर्वत्र वातावरण गणेशमय झाले आहे. आरत्या, भजनांनी वाड्या-वस्त्या निनादून गेल्या आहेत. गुरुवारी घरोघरी गौराईचे आगमन झाले होते. शुक्रवारी गौराईचे सुवासिनींनी विधीवत पूजन केले. त्यानंतर दुपारी नैवैद्य अर्पण करून आरती, भजन आणि फुगड्यांनी मातेचा जागर केला. शनिवारी गौरी-गणपतीच्या भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

    विसर्जनाचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. शहरातील गणपती विसर्जनासाठी गणेश भक्तांना गणपतीचे विसर्जन करण्यात यावे, याकरिता नगरपंचायत प्रशासनाने नियोजन केले होते. विसर्जनाचा सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.