हळवल फाट्यावरील अपघात रोखण्यासाठी गतिरोधक घाला, अन्यथा माती ओतून महामार्ग रोखणार

हळवल फाट्यावरील सातत्याने अपघात होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या दालनात मागण्यांबाबत चर्चा झाली.

    कणकवली : कणकवली गडनदी पुलानजिक हळवल फाट्यावरील धोकादायक वळणावर अपघात होऊन वीस ते पंचवीस लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या महामार्गावर येणाऱ्या वाहनांचा वेग मर्यादित होण्यासाठी राजापूर प्रमाणे डांबरी गतिरोधक घालण्यात यावेत. अपघात रोखण्यासाठी गतिरोधक १५ दिवसांत न घातल्यास माती ओतून महामार्ग रोखणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी दिला आहे. यावेळी अधीक्षक अभियंता श्री.जाधव यांच्याशी फोनवरून संपर्क साधून मागण्या सांगितल्या. त्यानंतर १५ दिवसांत गतिरोधक घालण्याचे उपअभियंता मुकेश साळुंके यांनी आश्वासन दिले.

    हळवल फाट्यावरील सातत्याने अपघात होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या दालनात मागण्यांबाबत चर्चा झाली. त्यानंतर प्रत्यक्ष हळवल फाटा येथे उपअभियंता मुकेश साळुंके यांना कुठे गतिरोधक घालावेत? वळणावर उजेड दिसण्यासाठी पथदीप लावण्यात यावेत, याबाबत सूचना जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केली. यावेळी रबलर गतिरोधक घालण्यात येतील, त्याची उंची ६ एम एस असेल, अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जागेचा सेफ्टी ऑडिट केल्यानंतर सूचना केली आहे. आपल्या मागणी प्रमाणे वरिष्ठ कार्यालयात १५ एम एम गतिरोधक घालण्याची मागणी केली जाईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन उपअभियंता मुकेश साळुंके यांनी दिले.

    यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, मालवण तालुका अध्यक्ष नाथ मालवणकर, प्रांतिक सदस्य विलास गावकर, प्रांतिक सदस्य दिलीप वर्णे, युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, सरचिटणीस गणेश चौगुले, किशोर घाडीगावकर, बाबू परब, जिल्हा सचिव सतीश पाताडे, अशोक वायंगणकर,राजू पिसे, अंकुश मेस्त्री,बाळू मेस्त्री, सुरेश केनी, विकास म्हस्कर, राजू वर्दम, सतीश पार्सेकर, उदय सावंत, केदार खोत, इम्रान शेख, सुनील जंगले आदी उपस्थित होते.