कणकवलीत मराठा समाजाचा निषेध मोर्चा, फडणवीस यांचा निषेध करण्याचे धाडस नितेश राणे यांनी दाखवावे – सतीश सावंत

मराठा समाजाबद्दल प्रेम असेल तर लाठीचार्जचे समर्थन करणाऱ्या गृहमंत्री फडणवीस यांचा जाहीर निषेध करण्याचे धाडस दाखवावे

    कणकवली : जालना येथील मराठा समाज उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि हवेतील गोळीबाराचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाच्यावतीने निषेध करण्यात आला आहे आणि या लाठीचार्जच्या निषेधार्थ सोमवार दि. ४ सप्टेंबर रोजी कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य मोर्चा काढत प्रांताधिकार्‍यांना निवेदन सादर करणार असल्याचे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले. हा मोर्चा पक्ष विरहित असून मराठा समाज बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहनही सतीश सावंत व आमदार वैभव नाईक यांनी केले. मराठा समाजाबद्दल प्रेम असेल तर लाठीचार्जचे समर्थन करणाऱ्या गृहमंत्री फडणवीस यांचा जाहीर निषेध करण्याचे धाडस दाखवावे असे आव्हानही सतीश सावंत यांनी नितेश राणेंना दिले आहे.

    कणकवली येथील विजय भवन येथे पत्रकार परिषद घेत मराठा समाजाचे नेते, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत व आमदार वैभव नाईक यांनी लाठीचार्ज बाबत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांच्यासमवेत युवा सेना संघटक तेजस राणे, रुपेश आमडोस्कर व अन्य सदस्य उपस्थित होते. सोमवारी दि. ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मराठा समाज आंदोलनानंतर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. नितेश राणे यांना मराठा समाजाबद्दल प्रेम असेल तर लाठीचार्जचे समर्थन करणाऱ्या गृहमंत्री फडणवीस यांचा जाहीर निषेध करण्याचे धाडस दाखवावे असे आव्हानही सतीश सावंत यांनी नितेश राणेंना दिले. पक्ष बदलला की आपली राजकीय भूमिका बदलणाऱ्या नितेश राणेंना स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी भाषा बदलण्याची सवय आहे. काँग्रेसमध्ये असताना धर्मनिरपेक्ष होते आता भाजपात जाऊन हिंदुत्ववादी असल्याचा आव आणला आहे. सोमवारच्या मोर्चात मराठा समाजासह मराठा प्रेमी समाजानेही सहभागी व्हावे असे आवाहन सतीश सावंत यांनी केले.

    आमदार वैभव नाईक म्हणाले, मराठा समाज एकत्र येऊन शांतपणे राज्यभरात आंदोलन करत आहे. महाविकास आघाडी सरकार काळातही आंदोलने झाली. पण ते दडपण्याचा प्रयत्न कधीच सरकारने केला नव्हता. मात्र फडणवीस शिंदेंच्या सरकारने जालना येथे सुरू असलेले हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज आणि हवेत गोळीबार करण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस हे पोलिसांवर दगडफेक झाल्याने लाठीचार्ज केल्याचे सांगत या लाठीचार्जचे समर्थन केले आहे. सोमवारी कणकवलीत होत असलेल्या लाठीचार्ज विरोधी आंदोलनातून पक्षभेद विसरून सर्व मराठा समाज एकवटून या घटनेचा निषेध करणार आहोत.

    कणकवली तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने गृहमंत्र्यांचा व मराठा समाजावर जालन्यामध्ये झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्याकरिता सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी रविवार दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता या मोर्चाच्या नियोजनाची बैठक मराठा मंडळ हॉल कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कणकवली सहित जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार वैभव नाईक व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.