शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात १ ते १२ ऑक्टोंबरपासून जिल्ह्यामध्ये होणार कार्यक्रम, केंद्र सरकारच्या अपयशाची जनजागृती करणार – गुरुनाथ खोत

शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जिल्हाप्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. "होऊ द्या चर्चा" हा कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले. देशामध्ये विरोधी पक्षांची इंडीया ही आघाडी झाली आहे.

    कणकवली : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हा लोकसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला आहे. लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीत शिवसेनाचं जिंकेल. आम्हीच जिंकणार आहोत. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी “होऊ द्या चर्चा ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख आलेत का? महागाई कमी झाली का? या मुद्द्यांची चर्चा प्रत्येक गावात, प्रत्येक घरात आणि वाडी वार १ ते १२ ऑक्टोंबर या कालावधीत करणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे निरीक्षक तथा शिवसेना नेते गुरुनाथ खोत यांनी दिली.

    कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला आघाडी प्रमुख निलम पालव – सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शहराध्यक्ष प्रमोद मसुरकर व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

    शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जिल्हाप्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. “होऊ द्या चर्चा” हा कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले. देशामध्ये विरोधी पक्षांची इंडीया ही आघाडी झाली आहे. त्यानंतर मोदी सरकारने सर्वच कार्यक्रम भारत या नावाने सुरू केले आहेत. त्यामुळे देशातील विरोधी पक्षाने एकजूट करत सत्ताधाऱ्यांचे अपयश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे धोरण हाती घेतले आहे .त्यानुसारच हा कार्यक्रम रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात घेण्यात येणार आहे, असे गुरुनाथ खोत यांनी सांगितले.

    केंद्रात २०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर १५ लाख रुपये देणार आणि महागाई कमी करणार, त्याचबरोबर परदेशात गुंतवणूक बेनामी संपत्ती असलेल्या लोकांवर कारवाई करण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते. याबाबत कोणतीही आश्वासने मोदी सरकारने पाळली नाहीत. त्यांनी कोणाच्याही मुसक्या आवळल्या नाहीत, याबाबत सामान्यांमध्ये जाऊन या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येईल असे श्री. खोत यांनी सांगितले.

    आता निवडणुका तोंडावर आल्यामुळे दोनशे रुपये गॅसचा दर कमी करण्यात आला, मात्र गेल्या ९ वर्षात सर्वसामान्य ग्राहकांकडून लूट करण्यात आली आहे. आधारकार्ड, आधार आणि पॅनकार्ड लिंक, गॅस कार्ड लिंक करा. या सारखे प्रकार जनतेला त्रासदायक आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावा गावात, जिल्ह्यात, वाडीवर भेटी देणार आहोत. पुढील १ ते १२ ऑक्टोंबर आम्ही सर्वांना सोबत घेऊन लोकांसमोर जाणार आहोत. प्रत्येक तालुक्यात आम्ही जाणार आहोत. मी स्वतः निरीक्षक या नात्यांने आम्ही जनतेला जागृत करणार आहोत, असेही गुरुनाथ खोत यांनी सांगितले.