सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री अधिकारांपासून वंचित, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झेंडावंदन करण्याचा अधिकार दुसऱ्याच मंत्र्यांना दिला जातो.

    कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय समित्यांवर सदस्यांच्या नेमणुका करण्याचा अधिकार हा पालकमंत्र्यांचा असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र याउलट परिस्थिती आहे. भाजपचे लोक परस्पर पत्रे देऊन नेमणुका करून घेत आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना वेगळे अधिकार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना वेगळे अधिकार आहेत का? असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.

    याचसंदर्भात आमदार वैभव नाईक म्हणाले, पालकमंत्री कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडून तसे होताना दिसत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झेंडावंदन करण्याचा अधिकार दुसऱ्याच मंत्र्यांना दिला जातो. शासकीय समित्यांवर दुसऱ्यांच्या शिफारशीने नियुक्त्या होत आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांकडे जिल्हा नियोजन बैठकीचेच अधिकार आहेत का?

    सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीची नेमणूक भाजप पदाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार करण्यात आली. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या अधिकारावर एकप्रकारे गदा आली आहे. भाजपच्या लोकांचे कामगार असल्याप्रमाणे जिल्हा प्रशासन काम करीत आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आपण राज्याच्या मुख्य सचिवांकडे करणार असल्याचेही आ. वैभव नाईक यांनी सांगितले आहे.