तळेरे – गगनबावडा रस्ता दुर्दशेबाबत ठाकरे शिवसेना ठाकरे गटातर्फे पदयात्रा

एडगांव, वैभववाडी, कोकीसरे फाटा, नापणे फाटा व पुढे नाधवडे अशी जवळपास २१ किमीची पदयात्रा असणार आहे. पदयात्रेत रस्त्याच्या दुर्दशेचीही पाहणी करण्यात येणार आहे.

    कणकवली : तळेरे ते गगनबावडा रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली असून त्याचा परिणाम ऊस वाहतूक, सिलिका, अन्य मालवाहतूक व सर्वच वाहनधारकांना होत आहे. रस्ता दुपदरीकरणाबाबत २०२२ मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तरी देखील या रस्त्याचे अद्यापही काम सुरु न झाल्याबाबत शासनाला जाग आणण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे करूळ ते नाधवडे अशी पदयात्रा सोमवार, ३० ऑक्टोबरला सकाळी ९ वा. काढण्यात येत आहे. पदयात्रेचा शुभारंभ पक्षाचे नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते होणार असून‌ पदयात्रेत आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत यांच्यासह पक्षाचे सर्व महत्वाचे नेते, पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली आहे.

    पारकर यांनी दिलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे, रस्त्याची दुर्दशा झाल्याने त्याचा या मार्गावरील ऊस वाहतूक, चिरे, सिलिका मायनिंग वाहतूक, मालवाहतूक, जिल्ह्यात येऊ इच्छिणारे पर्यटक, मुंबईकर चाकरमानी अशा सर्वांवरच होत आहे. या रस्त्याची केवळ दुरुस्तीच नव्हे तर दुपदरीकरण होणे गरजेचे आहे. कारण सिंधुदुर्गातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे. रस्त्यासाठी ११० कोटी रुपये मंजूरही झाले आहेत. तरीही रस्ताकाम होत नसल्याबाबत शिवसेनेतर्फे यापूर्वीही रास्तारोको करण्यात आला होता. त्यावेळी पाऊस संपल्यानंतर तात्काळ रस्ताकामाला सुरुवात करणार असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, अद्यापही या रस्ताकामाला सुरुवात झालेली नाही. त्यातच दुपदरीरणाबाबत भूसंपादन मोबदल्याचा प्रश्नही अनुत्तरीत आहे.

    साहजिकच झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पदयात्रेचा प्रारंभ करूळ घटपायथा येथून सकाळी ९ वा. होणार आहे. तेथून एडगांव, वैभववाडी, कोकीसरे फाटा, नापणे फाटा व पुढे नाधवडे अशी जवळपास २१ किमीची पदयात्रा असणार आहे. पदयात्रेत रस्त्याच्या दुर्दशेचीही पाहणी करण्यात येणार आहे.

    पदयात्रेमध्ये जिल्हाप्रमुख संजय पडते,‌ कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवा सेनाप्रमुख सुशांत नाईक, मंदार शिरसाट, महिला आघाडीप्रमुख नीलम सावंत, जान्हवी सावंत, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, जयेश नर, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर आदी उद्धव ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी तसेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर असे महाविकास आघाडीचेही पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

    सदर रस्त्याचे दुपदरीकरण होणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच पदयात्रेत उद्धव ठाकरे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडीचे‌ पदाधिकारी, शिवसैनिक, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह जनतेनेही सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. पारकर यांनी केले आहे.