स्वच्छ सर्वेक्षणात कराड नगरपालिका देशात अव्वल; कराडच्या शिरीपेचात रोवला गेला मानाचा तुरा

यंदाही स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशातील शेकडो नगरपालिकांमध्ये कराड नगरपरिषद पुन्हा एकदा अव्वल ठरली आहे. दि. १ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा बक्षीस वितरण आहे.

    कराड : कराड नगरपालिकेने पुन्हा एकदा देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. सलग चार वर्षे नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सातत्याने अव्वल राहिली आहे. यंदाही स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशातील शेकडो नगरपालिकांमध्ये कराड नगरपरिषद पुन्हा एकदा अव्वल ठरली आहे. दि. १ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा बक्षीस वितरण आहे. त्यासाठीचे निमंत्रण कराड नगरपालिकेस नुकतेच प्राप्त झाले आहे.

    दिल्ली येथे दि. २९ व ३० सप्टेंबर रोजी देशातील अव्वल ठरलेल्या नगरपरिषदांनी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत केलेल्या कलाकृती तसेच राबवलेले उपक्रमावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन ही केले आहे. कराड नगरपालिका ही या प्रदर्शनात भाग घेणार आहे.

    नगराध्यक्षांसह सर्वांचे योगदान…

    नुकत्याच झालेल्या स्पर्धेत तत्कालीन नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, उप नगराध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील यांच्यासह विविध विभागांचे सभापती, नगरसेवक ,आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, अभियंता ए. आर. पवार, पालिकेचे वरिष्ठ मुकादम मारुती काटरे तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी बजावली. तसेच कराडकर नागरिकांनी दिलेले योगदानाच्या जोरावर कराड नगरपालिका अग्रक्रमाने स्पर्धेत देशात अव्वल राहिली आहे.

    मुख्याधिकारी डांगे व डाके यांचे मौलिक योगदान

    स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील कराड नगरपालिकेचा प्रवास हा कायम अव्वल राहिला आहे. देशातील सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदा गटात कराड नगरपालिकेने सातत्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे. गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षणात काहीसा तांत्रिक बदल झाला असला तरी पालिकेने त्याचेही आव्हान स्पर्धेत यशस्वी पार पाडले. तत्कालिन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या उत्कृष्ट नियोजनाने सलग दोन वर्षे नगरपरिषद देशात प्रथम क्रमांकावर आली होती. त्याच्यानंतर आलेले मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचे प्रयत्नही यशस्वी ठरले आहेत.

    क्रमवारी समारंभादिवशीच जाहीर होणार…

    स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या केंद्रीय समितीने पाठवलेल्या या निमंत्रणात महाराष्ट्रातील पाच नगरपरिषदेचा समावेश आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड व पाचगणी नगरपरिषदेचा समावेश आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सुरुवातीला सलग दोन वर्षे कराड नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला होता. तर तिसर्‍या वर्षी दुसरा तर आता ही पहिल्या पाचमध्ये कराडचा समावेश झालेले आहे. याचा अंतिम निकाल व क्रमवारी दि. १ आक्टोंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभातच घोषित करण्यात येणार आहे.