कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

अपघातात जखमी झालेले संतोष जाधव यांच्यावर एमजीएम रुग्णालयात तर जयवंत हाबले यांच्यावर पनवेल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    कर्जत : कर्जत तालुक्यातील कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर इंनोव्हा गाडीला अपघात झाला. या अपघातात इनोव्हा गाडीमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून अपघात इतका भयानक होता की, राज्यमार्ग रस्त्याने कोसळलेली गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या दोघांवर पनवेल येथे उपचार सुरू असून या अपघाताची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून कर्जत रेल्वे पोलीस यांनी केली आहे.

    नेरळ ग्रामपंचायतचे सदस्य असलेले धर्मानंद गायकवाड हे आपल्या नातेवाईक आणि मित्रांसह मुंबई येथून आपल्या घरी नेरळ येथे आपली एम एच 46 बी ए 4261 या इनोव्हा गाडी मधून रात्री येत होते. मध्यरात्री नंतर पहाटे सव्वा तीन वाजता त्यांची गाडी कर्जत कल्याण राज्य रस्त्याने नेरळकडे येत होती. त्यावेळी चालक धर्मानंद गायकवाड यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचे पुलावरून थेट खाली 30 फूट कोसळली. त्याचवेळी पनवेल येथून कर्जतकडे एक मालवाहू गाडी प्रवास करीत होती. त्यामुळे कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरून कोसळलेली गाडी थेट मालवाहू गाडीवर कोसळली. त्यात मालवाहू गाडीचे कपलिंग तुटले आणि त्यामुळे मालगाडी अपघातग्रस्त झाली.

    मालवाहू गाडी थांबली असल्याने कर्जत रेल्वे स्थानकातून माहिती मिळताच मध्य परिमंडळ रात्रीचं कर्मचारी घटनास्थळी पोहचले. दिनांक 07/11/2023 राेजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कर्जत-पनवेल रेल्वे किलोमीटर खांब नं. 94/13 येथे कर्जत ते नेरळ राेड वरून एक चार चाकी वाहन हे ब्रिजवरील लाेखंडी संरक्षण कठडे तोडून थेट रेल्वे ट्रँक वरून जाणारी मालगाडीस धडकून अपघात ग्रस्त झाली होती अशी माहिती संबंधित कर्मचाऱ्याने कर्जत रेल्वे स्थानकात दिली. कर्जत रेल्वे स्टेशन मास्तर कल्पेश देशपांडे यांनी दिलेल्या संदेशानुसार काही रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मालवाहू गाडीवर कोसळलेली इनोव्हा गाडी काढण्यासाठी जेसीबी मशीन बोलावून घेण्यात आली.

    जेसिबीच्या मदतीने अपघातग्रस्त गाडी मधील पाच जणांना बाहेर काढले आणि त्यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्या अपघातग्रस्त गाडीमध्ये धर्मानंद यशवंत गायकवाड, वय अंदाजे 40 वर्षे मंगेश जाधव वय अंदाजे 35 वर्षे, मुंबई, नितीन जाधव वय अंदाजे 30 वर्षे, ठाणे संताेष सखाराम जाधव वय 38 वर्षे, नेरळ आणि जयवंत रामचंद्र हबाळे वय 43 वर्षे, नेरळ यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी धर्मानंद गायकवाड, नितीन जाधव, मंगेश जाधव हे मयत असल्याचे जाहीर केले. तर संतोष सखाराम जाधव आणि जयवंत हाबळे हे जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कामोठे येथे पाठविण्यात आले होते.

    या अपघातात जखमी झालेले संतोष जाधव यांच्यावर एमजीएम रुग्णालयात तर जयवंत हाबले यांच्यावर पनवेल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताची माहिती मध्य रेल्वेचे प्रशासनाने घेतली असून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी भेट दिली. सदरचा झाला प्रकार शहर हद्दीत असल्याने ते सदरबाबत आकस्मिक मृत्यू अशी दाखल करून अपघाताचा गुन्हा दाखल करीत आहेत. तसेच रेल्वे ट्रँक माेकळा करण्यात आलेला असून अपघातग्रस्त वाहन नंबर MH 46 BA 4261 हे क्रेनने उचलून बाजूला करून रहदारीस अडथळा हाेणार नाही.

    अपघाताची माहिती कळताच कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, आरपोआय जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, युवक अध्यक्ष महाडिक आदी सह कर्जत आणि खालापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते हजर होते. कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन केल्यानंतर धर्मानंद गायकवाड, मंगेश जाधव, नितीन जाधव या तिघांवर नेरळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगेश जाधव आणि नितीन जाधव हे दोघे धर्मानंद गायकवाड यांचे मावस भाऊ आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा बळी या अपघाताने घेतला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    पत्रकार आणि राजकारणी
    धर्मानंद गायकवाड यांचे मूळ गाव कर्जत तालुक्यातील आसल हे असून त्यांनी नोकरीच्या निमित्ताने नेरळ येथे राहण्यास सुरुवात केली. त्यांनतर नेरळ गावाचे रहिवाशी झालेले धर्मानंद यांनी नेरळ ग्रामपंचायतची निवडणूक लढवली असता त्यांनी विजय मिळवून ग्रामपंचायत सदस्य म्हणून गेली चार वर्षे कार्यरत होते. त्याचवेळी आर पी आय आठवले गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळत होते. तर पत्रकार म्हणून गेली 22 वर्षे रायगड टाइम्स सारख्या वृत्तपत्रात काम करीत असून रायगड प्रेस क्लब या संघटनेत जिल्हा उपाध्यक्ष तसेच कर्जत प्रेस क्लब चे अध्यक्ष या पदावर त्यांनी काम केले आहे.