
मेळाव्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. त्यासंदर्भात एकीकरण समितीला पत्र देखील देण्यात आले. मेळाव्यात कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. अशी माहित समोर आली आहे.
एकीकडे आज महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुद्दयांवर विधानसभा अधिवेशनात चर्चा होणार असून दुसरीकडे मात्र, महाराष्ट्र- कर्नाटक या सिमावादाच्या मुद्द्यावर मात्र बोलू पाहणाऱ्यांसोबत चर्चा तर सोडा त्यांच्या मेळाव्यालाही परवानगी नाकारली जात आहे. दोन्ही राज्याच्या सिमावादाच्या पार्श्वभुमीवर आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मेळाव्याच आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, कन्नडिगांची दादागिरी सुरुच असून अचानक कर्नाटक पोलिसांनी परवानगी या मेळाव्याला परवानगी नाकारली आहे. तसेच कर्नाटकात कलम 144 लागू करण्यात आले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे.
कर्नाटकच विधानसभा अधिवेशन आजपासून बेळगावात सुरू होणार आहे. या अधिवेशनात सर्वपक्षीय नेतेमंडळी उतस्थित राहण्याची शक्यताही आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सिमाप्रश्नी सर्वांच लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर मेळावा आयोजीत करण्यात आला होता. मात्र, या आयोजित मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित मेळाव्यासाठी उभारण्यात येत असलेल्या स्टेजच्या उभारणीचे काम थांबवण्याचे निर्देश देण्यात आले असून स्टेज हटवण्यात आला आहे. काल मेळाव्यास कर्नाटक पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र आता अचानक काम थांबविण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणाचे पदसाद आजच्या विधानसभा अधिवेशनात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या संदर्भात बेळगावचे पोलीस उपायुक्त रविंद्र गाडादी यांनी काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मेळाव्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. त्यासंदर्भात एकीकरण समितीला पत्र देखील देण्यात आले. मेळाव्यात कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. अशी माहिती रविंद्र गाडादी यांनी दिली. मात्र, अशाप्रकारे ऐनवेळी परवानगी नाकारल्याने नवा वाद होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी अमित शाहांनी घेतली बैठक
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्नामुळे निर्माण झालेला वाद निवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बैठक देखील घेतली. यानंतर आपण बेळगाव सीमेवर जाणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले मात्र आता हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील आणि खासदार धैर्यशील माने सीमाभागाचा दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सीमाभागातील मराठी बांधवांशी संवाद साधणार आहे. तसेच सीमाप्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे देखील देसाई म्हणाले.
यापुर्वीही कन्नडिगांची दादागिरी
गेल्या काही दिवसांपुर्वी कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात पाऊल ठेवण्यास मज्जाव करत कन्नड वेदिका रक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव-हिरेबागवाडी टोलनाक्याजवळ महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक आणि शाईफेक केल होती. यावरुन वातावरण तापलं असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गृहमंत्र्याची भेट घेतली होती. यावरुन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानी मात्र, एकप्रकारे या सगळ्या प्रकाराची खिल्ली उडवत या भेटीने काहीही साध्य होणार नाही असं म्हण्टलं होत. अशातच आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला नाकारलेली परवानगी खच्चीकरण करण्यासाठी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.