temple committee meeting
Kartiki Ekadashi

  Kartiki Ekadashi 2023 : मराठा आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापलेले असताना आता मनोज जरांगे राज्यभर दौरे करीत आहेत. मनोज जरांगे यांनी सरकारला 2 जानेवारीपर्यंतचे अल्टिमेटम दिले असताना, टाईम बॉंडचीसुद्धा मागणी केली आहे. त्याचबरोबर मराठा आंदोलकांनी, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कार्तिकी एकादशीला उपमुख्यंमंत्र्यांना येऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. आता हा तिढा सुटला आहे.

  कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा

  पंढरपूरमध्ये मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा होणार आहे. तसेच, फडणवीस अर्धा तास आंदोलकांनादेखील भेटणार आहेत.

  पाच मागण्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मान्य

  मराठा आंदोलक गणेश महाराज जाधव यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. आंदोलकांना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीला बोलावले होते. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मराठा समाजाच्या पाच मागण्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मान्य झाल्या आहेत.

  दोन उपमुख्यमंत्री असल्याने यंदा कोणाला बोलवायचे

  दरवर्षी आषाढीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. पण, यंदा कार्तिकीची महापूजा नेमकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार हा पेच मंदिर समिती समोर निर्माण झाला होता. कारण राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री असून यंदा पूजेला देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित द्यावे की अजित पवार यांना हा पेच समितीसमोर निर्माण झाला होता.