जूनपर्यंत कास धरण हस्तांतरित होण्याची चिन्हे ; खासदार उदयनराजे यांनी केली पाहणी

सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरण कामाची शनिवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली . कास धरणाच्या भिंतीसह लगतच्या कालव्याची पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले . जलसंपदा विभागाकडून काही तांत्रिक कामे झाल्यानंतर हे धरण लवकरच सातारा नगरपालिकेला हस्तांतरित होणार आहे .

    सातारा : सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरण कामाची शनिवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली . कास धरणाच्या भिंतीसह लगतच्या कालव्याची पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले . जलसंपदा विभागाकडून काही तांत्रिक कामे झाल्यानंतर हे धरण लवकरच सातारा नगरपालिकेला हस्तांतरित होणार आहे .

    या कास दौऱ्यामध्ये खासदार उदयनराजे यांच्यासह अॅड दत्ता बनकर, मुख्याधिकारी अभिजीत बापट, अशोका अर्थ मुव्हर्सचे संचालक अशोक सावंत, बांधकाम विभाग मुख्य अभियंता दिलीप चिद्रे तसेच उरमोडी धरण व्यवस्थापनाचे अभियंता उपस्थित होते

    कास धरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून यंदाच्या पावसाळ्यात हे धरण पूर्ण क्षमतेने भरले जाणार आहे . कास धरण सांडवा, सांडव्याची भिंत, पंपिंग स्टेशन, आणि धरणापासून निघणारा कालवा या सर्व कामाची खासदार उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली . कालव्या जवळ एका ओव्हर ब्रिजचे काम सध्या बांधकाम विभागाकडून सुरू आहे . या कामासाठी पालिकेने या विभागाला अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे . उदयनराजे यांनी ही कामे केव्हा पूर्ण होतील याची माहिती घेतली . काही तांत्रिक प्रक्रिया व इतर कामे पूर्ण झाल्यानंतर जलसंपदा विभागाकडून हा प्रकल्प सातारा पालिकेला हस्तांतरित केला जाणार आहे . साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यात हस्तांतरित होइल असा अंदाज उरमोडी धरण व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला .

    कासवरून निघणाऱ्या मोठया पाईपलाईनच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्यात आलेली आहे . यामध्ये दहा लाख लीटर क्षमतेच्या साठवण टाक्या व इतर सुविधांचा यामध्ये समावेश आहे . हा एकूण प्रकल्प तब्बल १०२ कोटी रुपयांचा आहे . या कामाची लवकरच सुरवात केली जाईल अशी माहिती सातारा पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिली .