कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची तारीख बदलली; नवीन तारीख माहितेय का? ‘हे’ आहे कारण.

बारावी आणि इतर परीक्षा असल्यामुळे मतदानासाठी केंद्र उपलब्ध होणे अवघड आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी एक दिवस आधीच मतदान घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे आता कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होईल.

    पुणे- पुण्यातील (pune) कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातून पोटनिवडणुकाबाबत (Kasba-Pimpri Chinchwad by election) एक मोठी व महत्त्वाची बातमी समोर येत आहे. इथले २७ फेब्रुवारीला रोजी मतदान होणार होते, मात्र २७ फेब्रुवारी ऐवजी २६ तारखेला मतदान (Election) होणार आहे, अशी समोर येत आहे. या पोटनिवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. बारावीची परीक्षा असल्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. बारावी आणि इतर परीक्षा असल्यामुळे मतदानासाठी केंद्र उपलब्ध होणे अवघड आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी एक दिवस आधीच मतदान घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे आता कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होईल. या पोटनिवडणुकीचा निकाल ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजीच जाहीर होणार आहे.

    या नावांची चर्चा…

    या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची परवा बैठक घेतली आहे. तसेच आज देखील भाजपाची महत्त्वाची बैठक होणार असून, दरम्यान, बैठकीनंतर उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. कसबा पेठेतून शैलेश टिळक, हेमंत रासणे, गणेश बिडकर आणि धीरज घाटे ही चार नावं चर्चेत आहेत. पुणे शहर भाजपकडून पक्षश्रेष्ठीना पाठवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कसबा पेठेतून कोण लढणार यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, सध्या तरी कमळ चिन्ह हाच उमेदवार मानून भाजपा कामाला लागली आहे.

    नावे जाहीर होणार…

    दरम्यान, पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ (Kasba Peth) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कोण उमेदवार असेल, तसेच पिंपरी चिंचवड यावरून आज महत्त्वाची बैठक होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वात ही बैठक होणारेय. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जातेय का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र चंद्रकांत पाटील हे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल असं म्हटलं आहे.