ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी डीन संजीव ठाकूरांवर मुश्रीफांकडून कोणतीही कारवाई नाही; आमदार रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

Lalit Patil Drugs Case : पुण्यातील ससून हॉस्पिटमधील ललित पाटील पलायन प्रकरण आणि ड्रग्ज रॅकेटवरून राज्यात राजकारण चांगलेच तापले होते. यामध्ये ससूनचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. कारवाईस परवानगी दिली नाही तर, रस्त्यावर उतरुन आंदेलन करणार असल्याचा इशारा धंगेकर यांनी दिला. यामध्ये हसन मुश्रीफ ठाकुर यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही धंगेकर यांनी केला.

  पुणे : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Lalit Patil Drus Case) पुण्यातील ससून रुग्णालयाचे माजी डीन डॅा. संजीव ठाकुर (Dr Sanjeev Thakur) यांना अटक करण्याची मागणी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केली आहे. ठाकुर यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना परवानगी मागूनही 25 दिवस होऊनही सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आमदार रविंद्र धंगेकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

  कारवाई करण्याची मागितलेली परवानगी नाकारली?
  आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पुणे पोलिसांनी (Pune Police) संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यासाठी परवानगी मागितली होती, पण ती नाकारण्यात आल्याची माझी माहिती आहे. मुश्रीफ स्वतः ईडीची कारवाई टाळण्यासाठी सरकारमधे जाऊन बसले आहेत, त्यांच्याकडून ठाकुरांवर कारवाई होईल ही अपेक्षा ठेवू शकत नाही, अशा शब्दात धंगेकर यांनी हल्लाबोल केला.

  ते पुढे म्हणाले की, मुश्रीफ यांनी परवानगी नाकारुन कारवाईची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. कारवाईस परवानगी दिली नाही तर, रस्त्यावर उतरून आंदेलन करणार असल्याचा इशारा धंगेकर यांनी दिला. मुश्रीफ ठाकूर यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोपही धंगेकर यांनी केला.

  कोणतीच कारवाई न झाल्याने भुवया उंचावल्या
  दरम्यान, ललित पाटीलच्या ड्रग्ज कृत्यांमध्ये उखळ पांढरे करून घेतल्याचा आरोप असलेल्या पुण्यातील ससून रुग्णालयाचे तत्कालीन डीन डॉ. संजीव ठाकूर (Dr. Sanjiv Thakur) यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करून त्यांना अटक करण्याची परवानगी पुणे पोलिसांकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला मागण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून तसे पत्र वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर करण्यात आले आहे. मात्र, यावर अजून कोणतीच कारवाई न झाल्याने भुवया उंचावल्या आहेत.

  पुणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत डॉ. ठाकूर दोषी आढळले होते. ठाकूर यांनी ललित पाटीलवर उपचार करण्याच्या नावाखाली त्याचा ससून रुग्णालयातील मुक्काम जास्तीत जास्त वाढेल यासाठी मदत केल्याचे पोलिसांना केलेल्या चौकशीत समोर आले होते. ललित पाटीलला त्याच्या टोळीसह ससून रुग्णालयातून ड्रग रॅकेट चालवताना अटक केल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी त्याच्या पित्ताशयाचे ऑपरेशन करण्याचा निर्णय डॉक्टर संजीव ठाकूर यांनीच घेतल्याचे निष्पन्न झाले होते. या ऑपरेशनसाठी एक्स रे काढताना ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता.

  ललित पाटील पळून गेल्यानंतर या प्रकरणात अनेकांवर संशयाची सुई वळली होती. त्यात महत्वाचं नाव डॉ. संजीव ठाकूर यांचं होतं. हे प्रकरण समोर आल्यानंतर संजीव ठाकूर यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं होतं आणि काही दिवस त्यांनी पुण्याच्या बाहेर असल्याचं माध्यमांना सांगितलं होतं. मात्र ज्यावेळी पुण्याची कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आणि ललित पाटील प्रकरणाची माहिती घेण्यासाठी घेण्यासाठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली होती. त्यानंतर धंगेकरांनी संजीव ठाकूर यांना सगळी माहिती मागितली असता ही माहिती देण्यातदेखीस टाळाटाळ केल्याचं समोर आलं होतं.