कवठेमहांकाळ आगाराकडून आ. सुमन पाटील यांच्याबद्दल अनुद्गार ;  आमदारांची पोलीस प्रमुखांकडे तक्रार 

आगार प्रमुख, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

    तासगाव : कवठेमहांकाळ आगाराच्या चालकांनी विद्यार्थिनींना अर्वाच्चपणे बोलून त्यांचा अपमान केला आहे. आमदार म्हणून माझ्याबद्दलही अनुद्गार काढले आहेत. याप्रकरणी विद्यार्थिनींनी संबंधित चालक व आगार प्रमुखांविरोधात प्रमुखांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी आमदार सुमन पाटील यांनी केली आहे. याबाबतची तक्रार त्यांनी पोलीस प्रमुख डॉ. बसवराज तेली यांच्याकडे केली आहे.
    याबाबत माहिती अशी,  मनेराजुरी व परिसरातील अनेक विद्यार्थी दररोज तासगाव येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र या विद्यार्थ्यांना तासगाव अथवा कवठेमहांकाळ डेपोची एकही बस वेळेवर मिळत नाही. त्यामुळे यापूर्वी विद्यार्थ्यांनी अनेक वेळा रास्ता रोको आंदोलन केले आहे.
    याबाबत आमदार पाटील यांनी दोन्ही आगाराच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कारभारात सुधारणा करण्याची सूचना केली होती. मात्र दोन्ही आगाराच्या कारभारात कसलीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आजही सकाळी सुमारे तीन तास बस न आल्याने मनेराजुरी येथील विद्यार्थी संतप्त झाले. त्यांनी बस अडवून रास्ता रोको केला.
    यावेळी कवठेमंकाळ आगाराच्या चालकांनी विद्यार्थिनींना अर्वाच्चपणे बोलून त्यांचा अपमान केला. तर आमदार सुमन पाटील यांच्या बद्दलही अनुद्गार काढले. या प्रकरणी आमदार पाटील यांनी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. तेली यांना निवेदन देऊन कवठेमंकाळ आगाराच्या वाहनचालक व आगार प्रमुखांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.