डोंबिवलीतील शिवमंदीर स्मशानभूमीत लाकडे पुरवणाऱ्या संस्थेला केडीएमसीने बजावली नोटीस 

शिवमंदीर स्मशानभूमीतील कामगार अंत्यसंस्काराकरीता येणाऱ्या मृताच्या नातेवाईकांसोबत गैरवर्तून करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. 

    डोंबिवली : शहराच्या पूर्व भागातील शिवमंदीर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाकडे पुरवणाऱ्या संस्थेच्या कर्मचारी वर्गाकडून गैरवर्तून आढळून आल्यास संस्थेचे काम बंद करण्यात येईल अशी नोटिस बजावली आहे अशी माहिती मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी दिली आहे. शिवमंदीर स्मशानभूमीतील कामगार अंत्यसंस्काराकरीता येणाऱ्या मृताच्या नातेवाईकांसोबत गैरवर्तून करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
    या तक्रारीची शहानिशा करण्याकरीता उपायुक्त गुळवे यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता त्याठिकाणी काही कामगार मद्यप्राशन करुन काम करीत असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्यांची खातरजमा करण्याकरीता त्यांना महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णलायात पाठविले. त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यांच्या वैद्यकीय चाचणी त्यांनी मद्यप्राशन केले आहे की नाही हे उघड होणार आहे. स्मशानभूमीत लाकडे पुरविण्याचे काम सुनिता पाटील यांच्या संस्थेला दिले आहे. या संस्थेकडून पुन्हा अशा प्रकारचे गैरवर्तणूक आढळून आल्यास त्यांचे लाकडे पुरविण्याचे काम बंद केले जाईल अशी नाेटिस बजावण्यात आली आहे.