school students image

केरळ राज्यासारखा शिक्षणाचा पॅटर्न(Kerala Education Pattern In Maharashtra) शालेय शिक्षण पद्धतीमध्ये राबवल्यानंतर शिक्षणासोबत कला, विज्ञान विषयाच्या गुणवत्तेत वाढ होऊ शकते, असं महाराष्ट्रातील शिक्षण विभागाला वाटतं.

  मुंबई : राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी शिक्षण विभाग इतर राज्यातील यशस्वी प्रयोग राज्यातील शिक्षणात राबवण्याच्या प्रयत्नात आहे. राज्यातील शिक्षण विभागात आता केरळ पॅटर्न (Kerala Education Pattern) राबविला जाणार आहे. केरळ शिवाय राजस्थान (Rajasthan) आणि पंजाब (Punjab) या राज्यातील शिक्षण पद्धतीमधील यशस्वी प्रयोगही राज्यात राबवले जाणार आहेत. (Maharashtra Education System Change) केरळ पॅटर्न लागू केला तर पुढील वर्षापासून तिसरीच्या विद्यार्थांची वार्षिक सराव परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्गांच्या परीक्षा होतील.

  महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची टीम देशातील अशा राज्यात पाठवली आहे जिथे शिक्षणासाठी वेगळे प्रयोग केले गेले आहेत. ज्या राज्यांनी शिक्षणात प्रगती झाली आहे त्या राज्यातील पॅटर्न महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये राबविणे, हा यामागचा उद्देश आहे. त्यामध्ये केरळ पॅटर्नवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. तसेच राजस्थान आणि पंजाबमधील मॉडेलचा देखील विचार केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

  कोरोनानंतर महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. तसेच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय असल्यामुळे विद्यार्थी गांभीर्याने परीक्षेचा विचार करत नाहीत. त्यामुळे केरळ राज्यासारखा शिक्षणाचा पॅटर्न शालेय शिक्षण पद्धतीमध्ये राबवल्यानंतर शिक्षणासोबत कला, विज्ञान विषयाच्या गुणवत्तेत वाढ होऊ शकते, असं महाराष्ट्रातील शिक्षण विभागाला वाटतं.

  केरळ पॅटर्नची वैशिष्ट्ये

  • केरळ पॅटर्नमध्ये प्राथमिक शाळा चालवण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना तर माध्यमिक शाळा चालवण्याच्या अधिकार जिल्हा परिषदेला असतो.
  • प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेतली जाते. कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागते.
  • दर दहा वर्षांनी अभ्यासक्रमात बदलतो.
  • विभागीय स्तरावर कला आणि विज्ञान मिळाव्यांचं आयोजन केलं जातं. विद्यार्थी लेखकास प्रोत्साहन दिलं जातं.
  • प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक व पालकांचं असोसिएशन कार्यरत आहे.
  • मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते.