कंपनी प्रदूषणाबाबत ग्रामपंचायतवर केलेल्या आरोपांबाबत केसुर्डी ग्रामपंचायत आक्रमक

केसुर्डी (ता. खंडाळा) येथील औद्योगिक वसाहतीतील दोन कंपन्यांच्या प्रदूषणाबाबत काढण्यात आलेल्या अर्धनग्न मोर्चावेळी केसुर्डी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व काही ग्रामपंचायत सदस्यांवर केलेल्या आर्थिक आरोपांबाबत केसुर्डी ग्रामपंचायत आक्रमक झाली आहे.

    खंडाळा : केसुर्डी (ता. खंडाळा) येथील औद्योगिक वसाहतीतील दोन कंपन्यांच्या प्रदूषणाबाबत काढण्यात आलेल्या अर्धनग्न मोर्चावेळी केसुर्डी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व काही ग्रामपंचायत सदस्यांवर केलेल्या आर्थिक आरोपांबाबत केसुर्डी ग्रामपंचायत आक्रमक झाली आहे. याबाबत पत्रकार परिषद घेत केलेले आरोप सिद्ध करून दाखवा अन्यथा कायदेशीर अब्रू नुकसानीचा दावा करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
    शिरवळ येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेवेळी केसूर्डी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आकाश खडसरे बोलताना म्हणाले की, वास्तविक पाहता प्रदूषणाबाबत अर्धनग्न मोर्चा काढताना संबंधितांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता तसेच पूर्वसूचना न देता सर्व गोष्टी केल्या आहेत. कंपनीसोबत ग्रामपंचायतचा आर्थिक बाबीत काडीमात्र संबंध नसताना केसुर्डी ग्रामपंचायतवर केलेले आरोप हे बिनबुडाचे असून फक्त सवंग लोकप्रियता मिळवण्याच्या दृष्टीने व स्वतःच्या फायद्याकरिता केलेले आहेत, मात्र नाहक बदनामी केसुर्डी ग्रामपंचायत खपवून घेणार नाही व केलेल्या आरोपांबाबत तीन दिवसात पुरावे सादर करा अन्यथा अब्रू नुकसानीची कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा कडक इशारा यावेळी देण्यात आला. ओरिएंटल ईस्ट या कंपनीमुळे पसरणाऱ्या दुर्गंधीबाबत केसुर्डी ग्रामपंचायतद्वारे कंपनी प्रशासनाला वारंवार पाठपुरावा सुरू आहे तसेच इलजिन ग्लोबल इंडिया या कंपनीच्या प्रदूषणाबाबत माती परीक्षण केले असता सकारात्मक निकाल आले आहेत. याबाबतीत निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आहेत त्यामुळे ग्रामपंचायतवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत असे यावेळी सांगण्यात आले.
    याप्रसंगी सरपंच सुरेखा ढमाळ, उपसरपंच सोनाली चव्हाण, माजी सरपंच गणेश ढमाळ, माजी उपसरपंच आनंदा ढमाळ, सूर्यकांत चव्हाण, रवींद्र ढमाळ, विश्वास ढमाळ, संतोष ढमाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.