धान्याचा काळा बाजार करणार्‍या तिघांना बेड्या, खडक पोलिसांनी वाहतुक करताना धान्याचा टेम्पो पकडला

पुणे शहरातील वेगवेगळ्या स्वस्त धान्य दुकानदारांमधून तांदूळ काळ्या बाजारातून विकत घेत तो तांदूळ केडगाव येथे विक्रीसाठी घेऊन जाणारा टेम्पो खडक पोलिसांनी पकडला. छापा कारवाईत तिघांना बेड्या ठोकल्या.

    पुणे : पुणे शहरातील वेगवेगळ्या स्वस्त धान्य दुकानदारांमधून तांदूळ काळ्या बाजारातून विकत घेत तो तांदूळ केडगाव येथे विक्रीसाठी घेऊन जाणारा टेम्पो खडक पोलिसांनी पकडला. छापा कारवाईत तिघांना बेड्या ठोकल्या असून, धान्याची काळ्या बाजारात विक्री करणारे स्वस्त धान्य दुकानदार देखील रडावर आले आहेत.

    जावेद लालु शेख (वय ३५), अब्बास अब्दुल सरकावस (वय ३४) आणि इम्रान अब्दुल शेख (वय ३०, तिघेही रा. काशेवाडी, भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेश प्रकाश जाधव यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक संगिता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

    मंगळवारी दुपारी खडक पोलिसांना अवैधरित्या स्वस्त धान्य दुकानदारांडून काळ्या बाजार भावाने तांदळू खरेदी करून तांदळ्याच्या गोण्यांनी भरलेला टेम्पो केडगाव येथे विक्रीसाठी निघाला असल्याची माहिती मिळाली. खडक पोलिसांनी काशेवाडी येथील राजीव गांधी सोसायटी येथे हा टॅम्पो लागलीच पकडला. त्यांच्याकडून मालवाहू टेम्पोसह ५४ तांदळाच्या १५ किलोच्या पिशव्या असा तब्बल २ हजार ७०० किलो तांदूळ जप्त केला. तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता हा धान्यसाठा त्यांच्याकडून विक्रीसाठी नेत असल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी तिघांना अटक केली.

    अटक केलेल्या तिघांनी काळ्या बाजारात धान्य खरेदी करून त्यांची विक्रीसाठी ते धान्य चालवले होते. त्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही कारवाई करून २ हजार ७०० किलो तांदूळ पकडला आहे. त्यांना कोणत्या दुकानादारांनी हा तांदूळ विकत दिला, याचा तपास केला जात आहे. तेही लवकरच पकडले जातील.

    - संगिता यादव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खडक पोलिस ठाणे.

    मोठे रॅकेट असण्याची शक्यता

    शासन गरिब नागरिकांना धान्य स्वस्तात देते. पण, त्यांच्या वाट्याचे धान्य या दलालांकडून काळ्या बाजारात विक्री केले जाते. हे प्रकार वाढीस लागले आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांकडून खरेदी करून त्याची चढ्या किंमतीने विक्री होते. त्यांना हे धान्य रेशनिंग दुकानदारांनी कसे विकत दिले. ते दुकानदार कोण आहेत, यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून हा काळा बाजार केव्हा पासून सुरू होता याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. गरिबांच्या तोंडचा घास पळविणार्‍यांना अटक होणे गरजेचे असून, पोलिसांकडून कसून याचा शोध घेतला जात आहे.