खडकवासला कालवा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

एम‌. एस. टकले यांची माहिती

  पाटस : जलसंपदा विभागाकडून मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खडकवासला कालवा दुरुस्तीच्या कामास नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. टप्प्या टप्प्यात चौफुला ते गिरीम पर्यंत हे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती पाटस पाटबंधारे उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता एम‌. एस. टकले यांनी दिली.

  दौंड तालुक्यातुन गेलेल्या खडकवासला कालवा मागील अनेक वर्षांपासून खराब झाला होता. ह्या कालव्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला होता. तसेच जलपर्णी व काटेरी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच दोन्ही बाजूच्या सिमेंट काँक्रीट तुटल्याने खराब झाले होते. त्यामुळे या कालव्यामधुन पाण्याचे पाझर होवुन पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे कालव्याची दुरुस्ती कामे करण्याची मागणी शेतकरी करत होते. ह्या कामाच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाने अंदाजे १५ कोटी रुपये निधींची तरतूद केल्याने ह्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

  कालव्यातील गाळ काढणे जलपर्णी तसेच झाडे झुडपे, गवत काढून स्वच्छता करणे, दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रीटचे पक्के काम करण्यात येणार आहे. तसेच कालव्याच्या दोन्ही बाजूचे भरावावर रस्ते करणे, बांधकाम दुरुस्ती करणे,अशा अस्तरीकरण कामे करण्यात येणार आहे.

  चौफुला ते पाटस व पाटस ते गिरीम पर्यंत ह्या कालवा दुरुस्ती चे काम ठेकेदारामार्फत करण्यात येणार आहे. हे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी असणार आहेत, अशी माहिती टकले यांनी दिली.

  -कालव्यातून पाण्याची गळती थांबणार
  दरम्यान, खडकवासला कालवा दुरुस्तीचे काम झाल्यास धरणातुन येणारा पाणी प्रवाहाला अडथळा येणार असून जलद गतीने पाणी वाहणार आहे. तसेच या कालव्यातून पाण्याची गळती थांबणार असून पाण्याची बचत होण्यास मदत होणार आहे. तसेच कालव्यावरील दोन्ही बाजूचे भरावावरील रस्ते चांगले झाल्यास शेतकऱ्यांना शेतमाल ने-आण व ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होणार आहे.