mother temple in beed

राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील रहिवासी असलेल्या शेतकरी कुटुंबातील राधाबाई खाडे यांचं गेल्या वर्षी 18 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे अचानक निधन झालं. त्यांच्या निधनाने खाडे कुटुंबाला मोठा धक्का बसला.

    बीड: देशात अनेक मंदिरे आपण पाहिली असतील. मात्र आईचं मंदिर कधी बघितलं आहे का? आईच्या मृत्यूनंतर बीड (Beed News) जिल्ह्यातील एका कुटुंबाने आपल्या आईचं मंदिर (Mother Temple Beed) बांधलं आहे. सध्या अनेकजण हे मंदिर पाहण्यासाठी गर्दी करू लागले. तब्बल नऊ लाख रुपये खर्च करून सावरगाव घाट इथे आपली दिवंगत आई राधाबाई खाडे (Radhabai Khade) यांचं भव्य व देखणं मंदिर मुलांनी उभारलं आहे. या मंदिरात राधाबाई यांचं अत्यंत सजीव वाटावं असं तब्बल पावणे तीन फूट उंचीचे शिल्प तयार करण्यात आले आहे. या मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना होणार आहे.

    राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील रहिवासी असलेल्या शेतकरी कुटुंबातील राधाबाई खाडे यांचं गेल्या वर्षी 18 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे अचानक निधन झालं. त्यांच्या निधनाने खाडे कुटुंबाला मोठा धक्का बसला. या कुटुंबात राधाबाई यांचे पती शंकर खाडे यांच्यासह त्यांची तीन मुले, विष्णू, राजेंद्र आणि छगन तसेच विवाहित मुलगी आशा हे सदस्य आहेत. राधाबाई यांच्या निधनानंतर एक महिन्यातच या तिन्ही भावंडांनी आपल्या दिवंगत आईची स्मृती कायम असाव्यात असे काहीतरी करू असा विचार करून आपल्या जागेमध्ये आईचे भव्य मंदिर बांधण्याचा निश्चय केला. तसेच तातडीने मंदिराचे काम सुरू केले.  तब्बल 10 बाय 13 च्या जागेत या मंदिराच्या उभारणीचं काम सुरु झालं. सहा महिन्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी सजीव वाटावी अशा प्रकारची मूर्ती बसवण्याचं ठरवलं.

    पुण्यातल्या मूर्तिकाराने साकारली मूर्ती
    मूर्तिकाराचा शोध सुरू केल्यानंतर पुण्यातील कातोरे या शिल्पकाराची माहिती त्यांना मिळाली. तब्बल चार ते पाच महिने या मूर्तीवर काम करून कातोरे यांनी आकर्षक व पाहता क्षणी सजीव वाटावी अशा प्रकारची राधाबाई खाडे यांची सुंदर मूर्ती तयार केली. पावणे तीन फूट उंच अशी मूर्ती त्यांनी बनवली. या मंदिरासाठी व मूर्तीसाठी सर्व मिळून तब्बल नऊ लक्ष रुपये खर्च आला आहे.

    दिनांक 18 मे 2022 रोजी राधाबाई खाडे यांचे निधन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या मुलांनी राजेंद्र, विष्णू व छगन यांनी एक वर्षाच्या आत आपल्या आईचं मंदिर बांधण्याचा संकल्प पूर्ण करायचा निश्चय केला होता. त्यानुसार आता त्यांचा संकल्प पूर्ण झाला असून येत्या दोन दिवसांमध्ये या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात होणार आहे. आईचं या पंचक्रोशीतील हे एकमेव भव्य असं मंदिर असणार आहे.

    आई म्हणजे प्रत्येकासाठीच सर्वस्व – राजेंद्र खाडे
    आई म्हणजे प्रत्येकासाठीच सर्वस्व असते. जगातील कोणताही देव किंवा व्यक्ती ही आईची जागा घेऊ शकत नाही. सर्वात मोठे देवत्व हे आईमध्येच सामावलेले आहे. त्यामुळे आम्ही आईचे मंदिरच बांधण्याचा निर्धार केला. आईच्या आशीर्वादानेच आमचा हा संकल्प आता पूर्ण झाला आहे, असं राधाबाईंचा मुलगा राजेंद्र खाडे यांनी म्हटले आहे.