अवैध शस्त्रांचे खानदेश कनेक्शन! जिल्हा पोलिसांकडून ३५ बंदुका जप्त; जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था धोक्यात

सातारा जिल्ह्यामध्ये सातत्याने अवैध बेकायदेशीर शस्त्र आढळून येत आहेत. ही अवैध शस्त्रे सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर असणाऱ्या एका छोट्या गावातून येत असून हे खानदेश कनेक्शन सातारा जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणारे ठरले आहे.

  सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये सातत्याने अवैध बेकायदेशीर शस्त्र आढळून येत आहेत. ही अवैध शस्त्रे सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर असणाऱ्या एका छोट्या गावातून येत असून हे खानदेश कनेक्शन सातारा जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणारे ठरले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख आणि त्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या शस्त्रास्त्रांचे पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली आहे.
  सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षात तब्बल १११ अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशी बेकायदेशीर शस्त्रे आणून त्याची भरमसाठ किमतीने विक्री करणारी एक मोठी साखळी अप्रत्यक्षरीत्या कार्यरत असून त्यांना कायदेशीर चाप लावणे पोलिसांच्या दृष्टीने मोठे आव्हान राहिले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सहा महिन्यापूर्वी साताराच्या जिल्ह्याचा पदभार स्वीकारला आहे. अवैध शस्त्र प्रकरणी आतापर्यंत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी ३५ विनापरवाना पिस्तुले जप्त केली आहेत. यासर्व अवैध शस्त्रांची कुंडली काढली असता मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर खानदेश लगत असणारे उमर्टी या गावाचे नाव समोर आले आहे. या गावाच्या जवळून अनेर नावाची नदी गेलेली आहे. या परिसरात बेकायदा शस्त्र तस्करी केली जाते. गेल्या काही वर्षापासून काही अपप्रवृत्ती येथे शस्त्राचा कारखाना काढूनच बसल्याची माहिती आहे. इथूनच मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात बंदुकांची शेकडोने आवक झाली आहे. या प्रकरणात मध्यस्तांची मोठी साखळी असून पंधरा हजार रुपयाची बंदूक महाराष्ट्रात ६० ते ७० हजार रुपये पर्यंत विकली जाते. सातारा पोलिसांनी अत्यंत सतर्कपणे कारवाई करून या प्रकरणातील दोन एजंट ताब्यात घेतले आहेत. संबंधित एजंटांना हाताशी धरून पैशाचा व्यवहार चालवायचा. हा या टोळीचा मोडस होता. सातारा एलसीबीने २८ मार्च २०२३ मध्ये कराडमध्ये एकाच वेळी दहा जणांना नाटक करून १४ बंदुका जप्त केल्या. याच कारवाईतून खानदेश लिंक पहिल्यांदा समोर आली होती. तेथेच लक्ष देऊन सातत्याने तपास केला असता १५ मे २०२३ रोजी तिघांना अटक करून पाच बंदूक जप्त करण्यात आल्या. या कारवाईत महाराष्ट्राच्या सीमेपलीकडून ही तस्करी झाल्याचे समोर आले होते.

  तपास यंत्रणेकडूनही कारवाई
  सातारा पोलिसांनी याच प्रकरणात पुढील तपासणीसाठी मध्यप्रदेशामधील उमर्टी गाव गाठले. त्याचवेळी एनआयएच्या पथकाने सुद्धा छापा टाकून कारवाईला सुरुवात केली होती. सातारा पोलिसांच्या ॲक्शन नंतर देशातील सर्वोच्च यंत्रणा असलेल्या तपास यंत्रणेकडूनही कारवाई झाल्याने सातारा पोलिसांच्या कारवाईचे महत्त्व अधाेरेखीत झाले आहे.

  ३५ पिस्तुले आणि ३६ काडतुसे जप्त
  सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईनुसार २०१८ मध्ये ७ पिस्तुले, ५ काडतुसे, २०१९ मध्ये ५ पिस्तुले १६ काडतुसे, २०२० मध्ये १० पिस्तुले, ४२ काडतुसे, २०२१ मध्ये ६ पिस्तुले, ११ काडतुसे, २०२२ मध्ये १ पिस्तूल १ काडतुस, २०२३ मध्ये ३५ पिस्तुले आणि ३६ काडतुसे जप्त केली आहेत.