नेवाशात भरदिवसा आठ तोळे सोन्यासह १५ हजारांची रोकड लंपास

    सोनई : नेवासा तालुक्यातील पानेगाव येथील शिक्षकाच्या घरातून आठ तोळे सोने आणि १५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. पानेगाव-शिरेगाव रोडजवळ शिवाजी राजाराम जंगले यांच्या वस्तीवर आज भर दुपारी एकच्या दरम्यान दरोडा टाकत सुमारे आठ तोळे सोन्यासह १५ हजारांवर डल्ला मारत चोरट्यांनी पोबारा केला.

    घटनेची माहिती होताच सोनई पोलिसांनी घटना ठिकाणीची पाहणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरत करत आहे. आतापर्यंत रात्रीच्या चोऱ्या होत होत्या. मात्र, आता दिवसाही चो-या होत असल्यामुळे मुळाकाठ परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुलूप लावलेली घरे, घरात कुणी नसल्याचा फायदा पाहून चोरटे हात साफ करताना दिसत आहे.