गोदावरीत ३२६९२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग; कोपरगांवच्या गोदावरी तटावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    कोपरगाव / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीस नांदूरमध्यमेश्वर येथून आज सायंकाळी उशिरा ३२६९२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून त्यामुळे पाणी साठ्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कोपरगांवचे तहसीलदार विजय बोरूडे यांनी दिली आहे.

    नागरिकांनी तालुका प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या कुटुंबांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, नदी, ओढे व नाल्यांच्या काठी राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहावे, नदी अथवा नाले यावरील पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडून जाऊ नये, पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, धोकादायक झालेल्या तलावांच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या प्रवाहामध्ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी चढू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडाखाली अथवा विद्यूतवाहिनी जवळ थांबू नये. आपत्कालीन परिस्थितीत तहसील कार्यालय नियंत्रण कक्ष येथील दूरध्वनी क्रमांक ०२४२३- २२२७५३ यावर संपर्क करावा. असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.