नगरमधील ३५ गावे ‘नॉट रिचेबल’च; खासदार विखे देणार मदतीचा हात

  नगर तालुका / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : नगर दक्षिणेत ३५ गावे मोबाईलच्या रेंजपासून गायब आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकांचा जनसंपर्क तुटला आहे. त्यामुळे यांना विविध प्रश्नाला सामोरे जावे लागते. या भागातील मोबाईल रेंजचा प्रश्न सोडविण्यासाठी भारत सरकारकडे या भागात टावर बसविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. लवकरच या ३५ गावांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

  नगर तालुक्यातील रंजणी गावात मोबाईल रेंज नाही. त्यामुळे कोरोनाच्या काळात सर्व शाळा बंद आहे. या गावातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नाही. यासाठी स्वखचार्तून लवकरच वाय-फाय सुविधा देणार असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. विकासकामांबरोबर भावी पिढीचे प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. यासाठी सर्वप्रथम युवकांचे प्रश सोडविण्यास प्राधान्यक्रम दिला आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मुलांच्या भविष्याचा विचार करून शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे खा. विखे यांनी सांगितले.

  आ. बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून नगर तालुक्यातील रांजणी येथे विविध विकास कामांचा प्रारंभ खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, बाजार समिती सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष मस्के, सरपंच बाळासाहेब चेमटे, उपसरपंच विजय लिपणे, रेवन चो•ो, बाळासाहेब महाडिक, राहुल पानसरे, अशोक चेमटे, नारायण लिपने, रामदास लिपने, शंकर थोरात,चिमाजी थोरात, भीमसेन हारदे, पवन थोरात, राजन चेमटे, डॉ.कुलथे, दत्तात्रेय बारवेकर, डॉ. बी. के. कोठुळे, डॉ. टी. पी. घोडके, बन्सी कराळे, एम. बी. कांबळे, एस. व्ही. कुलथे, एस. व्ही. लिपणे उपस्थित होते.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडच्या काळात सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय हा कौतुकास्पद आहे, आम्ही सर्वजण एकत्रित राहून जनतेचे प्रश्न सोडविण्याला महत्त्व देत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आगडगाव,रांजणी या गावात सुमारे ८कोटी रुपयांची रस्त्याची कामे सुरू आहे.

  – बबनराव पाचपुते, आमदार.

  आगडगाव, रांजणी, माथणी हा परिसर डोंगर परिसरात वसला आहे. या भागातील शेतकऱ्यांना व नागरिकांना दळणवळणाचा गंभीर असलेला प्रश्न आमदार असताना सोडविला. ही सर्व गावे डांबरीकरण करून शहरीकरणांच्या संपर्कात आणली. राज्य सरकारच्या विविध योजना या गावांपर्यंत पोहोचविल्या. आज ही सर्व गावे विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

  – शिवाजी कर्डिले, माजी मंत्री