योग क्षेत्रात करिअर करत ‘त्याने’ मिळवून दिला अनेकांना रोजगार (योग दिन विशेष)

  संदीप रोडे/अहमदनगर : योग हा केवळ आरोग्यासाठीच आहे असं नाही, तर योगक्षेत्रात आपण करिअरही करु शकतो. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील धनगर समाजाच्या मुलाने योगाचं शिक्षण घेतलं. दुबईत नोकरी केली आणि आता भारतात येऊन मोक्ष योगा स्कूलची स्थापना करत योग प्रसाराबरोबर योगाचं शास्त्रशुध्द प्रशिक्षण देत मुलांना करिअर मंत्र दिला आहे. योगाचं शिक्षण घेतलेली ग्रामीण भागातील मुलांना परदेशी नोकरी मिळवून देण्याबरोबरच त्यांना मजुरीच्या जोखंडातून मुक्त करण्याचं काम या तरुणाने केले आहे. देवा उर्फ मालु शरमाले असं या तरुणाचे नाव आहे.

  अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरच्या माळराना वर देवा उर्फ मालू शरमालेच लहानपण गेलं. धनगर या भटक्या जमातीत जन्मलेल्या मालूने सुरूवातीला मेंढ्या चारणे, नांगर धरणे अशी कामे केली. २००० सालात मात्र त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली. संगमनेर महाविद्यालयातून बीए मराठीपर्यंत शिक्षण घेतलेल्या देवाने डिप्लोमा योगा आणि नॅचरोपथीचा कोर्स केला होता. विविध ठिकाणी काम करतानाच त्याला दुबईत योग प्रशिक्षकाची मागणी असल्याचे कळाले, तिथं त्याने नोकरी मिळण्याचा प्रयत्न केला अन् लागलीच यश मिळाले. परदेशात योगा प्रशिक्षक म्हणून नोकरी करताना विदेशात योग शिकविण्यासाठी शिक्षकांची मागणी असल्याचे त्याच्या लक्षात आले.

  गावाकडे अनेक बेरोजगार मुलांना मिळेल ती कामे करावी लागतात. तळेगाव, निमोण या भागात पावसामुळे अनेकांची घरची शेती असूनही त्यातून उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शिकलेली मुलं दगड फोडणे, डाळींबाची छाटणी करण्यासाठी जातात हे मालू विसरला नव्हता. गावाकडच्या मुलांची ही अवस्था सुधारण्यासाठी मालु अहमदाबादेत ‘इटर्नरी वेलन्स प्रा.लि.’  ही देशातील योगामधील पहिली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली. त्यानंतर संगमनेर तालुक्यातील समनापुर या छोट्याशा गावात ‘मोक्ष योगा स्कुल’ सुरु करत ग्रामीण भागातील मुलांना योग प्रशिक्षकाची पदविका एका वर्षाच्या कोर्सद्वारे दिली जाते. तेथून आतापर्यंत १३ बॅचमधील २५० जणांना अमेरिका, कॅनडा, रशिया, चीन, व्हिएतनाम, जपान, ऑस्ट्रेलिया या देशात योग प्रशिक्षक म्हणून नोकरी मिळाल्याने त्यांचे जीवनमान बदलून गेले आहे. वाढत्या बेरोजगारीत योग प्रशिक्षक हाही करिअरचा उत्तम पर्याय असल्याचे मालूने दाखवून दिले आहे.

  नगरचे ७० ट्रेनर परदेशात

  अल्पशिक्षित तरुण आता चीन, व्हिएतनाम, मलेशिया, मकाऊ, कंबोडिया आणि अन्य देशांत योग प्रशिक्षक म्हणून कार्यरत होऊ लागले आहेत. मोक्ष योग संस्थेचे संस्थापक देवा म्हालू व त्यांची पत्नी वंदना म्हालू यांच्या प्रयत्नातून ही किमया साधली गेली आहे. दगड फोडण्यासाठी हातोड्यावर कठोर घाव घालणारे या तरुणांचे हात आता विविध योगमुद्रेत गुंतल्याचे दिसून येते. नगरसह राज्याच्या अन्य भागांतून आलेले मोक्ष योग संस्थेतील १०० युवक परेदशात योग प्रशिक्षक म्हणून कार्यरत झाले आहेत. त्यात नगर जिल्ह्यातील ७० जणांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुबियांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे.

  कधी काळी परिसरात दगड फोडण्याचे काम करणारे तुळशीराम कोटकर यांची दोन्ही मुलं योगाचे शिक्षण घेऊन प्रशिक्षक झाली आहेत. पहिला मुलगा मोठा झाल्यानंतर दगड खाणीवर ट्रक्टर चालविण्याचे काम करत होता. देवा म्हालु यांनी त्याला योगाचे प्रशिक्षण दिल्याने तो आता चीनमध्ये नोकरी करत आहे. तर त्याचा लहान भाऊ त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत आता व्हिएतनामला योग शिक्षक म्हणून जाणार आहे.

  – प्रविण कोटकर, योग शिक्षक

  शहरी असो वा ग्रामीण भागातील मुले आता एमबीएचे शिक्षण घेतलेले असतानाही योग शिक्षण घेत परदेशात योग शिक्षकाची नोकरी करणे पसंत करत आहेत. दुष्काळी गावातील तरुणांना योग प्रशिक्षक हा चांगल्या पगाराचे आणि प्रतिष्ठेचे करिअर म्हणून नवीन पर्याय उभा राहिला.

  – संगीता कुदलकर, चीनमधील योग शिक्षक रवीची आई